पॅराग्लाइडरची दोरी तुटली, पॅराशूटही उघडले नाही; जल महोत्सवात दोघांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील हनुवंतीया जल महोत्सवात बुधवारी झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये इव्हेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पॅराग्लाइडिंग करताना त्यांचा अपघात झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेच्या न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेने येथे आलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मध्य प्रदेशातील गोवा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या ठिकाणच्या व्यवस्थापन आणि जल महोत्सवाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सनसेट इव्हेंट कंपनीचे दोन कर्मचारी बुधवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पॅराग्लाइंडिंगच्या कसरती दाखवत पर्यटकांना आकर्षित करत असताना ही दुर्घटना घडली. ते दोघे उंचावर गेल्यावर त्यांच्या पॅराग्लाइडरची दोरी अचानक तुटली. तसेच त्यावेळी पॅराशूटही उघडले नाही. त्यामुळे ते दोघे उंचावरून खाली कोसळले. ग्लाइडर पडलेल्या ठिकाणी लोकांनी धाव घेत ग्लाइडरची जाळी कापून त्यांची सुटका केली. त्यानंतर त्या दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

त्या दोघांना मुंदी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सुरेंद्रसिंह राजपूत (28) आणि रामप्रताप दांगी (32) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुनासा येथील एसडीएम सखोल चौकशी करणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेबाबतची माहिती, फोटो किंवा व्हिडीओ असल्यास ते एसडीएम देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतचे फोटो किंवा व्हिडीओ मिळाल्यास तपासाला मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे जल महोत्सवासासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महोत्सवाच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या