उकळते लोखंड अंगावर पडल्याने 6 कामगारांचा मृत्यू, दोघांची मृत्यूशी झुंज सुरू

प्रातिनिधिक फोटो

जालना येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील ‘ओम साईराम स्टिल कंपनी’मध्ये गुरुवारी मार्च रोजी झालेल्या अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. आणखी दोन कामगारांचा संभाजीनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 6 झाली आहे.

‘ओम साईराम स्टिल कंपनी’मध्ये गुरुवारी लोखंडाचा तप्त रस वाहून नेणारी स्काय बकेट तुटून कामगारांच्या अंगावर लोखंडांचा तप्त रस पडला होता. हा तप्त रस 1600 डिग्री तापमानावर लोखंडाला तापवून तयार केला जातो. काल दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये चार कामगारांचा कोळसा झाला होता तर 8 कामगार गंभीर भाजले होते. भरत पंडीत, अजयकुमार सहानी, रामजितसिंग बिनवाजसिंग जागेवरच ठार झाले होते. तर अंकुर कुमार ललन याचा उपचारासाठी संभाजीनगरला पाठवत असतांना वाटेतच मृत्यू झाला.

गंभीर भाजलेल्या कामगारांना संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांना राजाकुमार अशोककुमारसिंह व प्रदीप कुमार यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुंजमील खान, राकेश पाल, प्रदीप रॉय हे संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. याच अपघातात जखमी झालेले अनिल कुमार व संजीव कुमार हे दोन कामगार जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान, या प्रकरणी जालना येथील चंदनझिरा पोलीस ठाण्यात अनिल कुमार नंदुराम यांच्या फिर्यादीवरुन कंपनीचे संचालक राजेंद्र भारुका, जवाहर डेम्बडा, प्रतिक गोयल, सुनिलसिंग, शेख जावेद आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना जामीन मंजुर केला आहे. पोलीस अधिक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार आदींनी घटनास्थळी व जिल्हा रुग्णालयात भेट देवून पाहणी केली. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या