खांबावर लटकलेली केबल स्कुटीत अडकल्याने अपघात; महिलेचा मृत्यू

642
accident

जालना रस्त्यावर खांबावरून लटकलेली केबल स्कुटीच्या हॅण्डलमध्ये अडकल्याने तोल जाऊन महिला खाली कोसळली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या वाहनाने महिलेला चिरडले. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली.

चिकलठाणा येथील कासलीवाल पुर्वमध्ये राहणाऱ्या ललीता शंकर ढगे या स्कुटीने सकाळी जीमला जाण्यासाठी निघाल्या होत्या. जालना रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयासमोर खांबावर लटकलेली केबल त्यांच्या स्कुटीच्या हँण्डलमध्ये अडकल्याने ललीता ढगे खाली कोसळल्या. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या वाहनाचे चाक अंगावरून गेल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत ललीता ढगे यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. कार्तीक पंडलिक ढगे यांच्या तक्रारीवरुन वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल चव्हाण करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या