मराठी शाळेचे दोन वर्ग छतासह कोसळले

20

सामना ऑनलाईन । जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील तब्बल ८५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या देसाई विद्यामंदिर या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या इमारतीच्या दोन खोल्या छतासह कोसळल्या. सोमवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तथापि, ही इमारत धोकादायक बनल्याने नवीन इमारत मिळेपर्यंत शाळा न भरवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

उदगाव येथे माळभागात देसाई विद्यामंदिराची मराठी शाळा आहे. १९३२ साली या शाळेची दहा खोल्यांची इमारत बांधण्यात आली. जिल्हा परिषदेकडून या इमारतीची डागडुजी केली जाते. १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने शाळेस नुकतीच रंगरंगोटी करण्यात आली आहे. सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शाळेच्या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना मोठा आवाज ऐकू आल्याने त्यांनी तेथे धाव घेतली असता या शाळेच्या इमारतीतील खोली क्र. ८ व ९ मधील भिंत व त्यावरील छत कोसळल्याचे निदर्शनास आले.

सकाळी या घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी एस. के. जाधव, गटशिक्षण अधिकारी ए. बी. वांदरे, शिरोळ पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगुले, उपसभापती कविता चौगुले, सरपंच स्वाती पाटील, ग्रामविकास अधिकारी भाग्यश्री केदारी, पंचायत समिती सदस्य मीनाज जमादार, मन्सूर मुलाणी, सुरेश कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जयश्री पाटोळे, उपसरपंच शिवाजी कोळी, मुख्याध्यापक विजयकुमार कोळी यांनी भेट देऊन पाहणी केली. महसूल विभागाच्या अधिकाऱयांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

१५ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर आणि शाळेच्या वेळेत ही घटना घडली असती, तर मोठी जीवितहानी झाली असती. तब्बल ८५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या शाळेच्या दगडी भिंतींना तडे गेले आहेत. इमारत कोसळेपर्यंत या इमारतीची दुरवस्था संबंधित विभागाच्या लक्षात कशी का आली नाही?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या