उरणमध्ये अवजड वाहनाने पोलिसाच्या दुचाकीला उडवले; पोलीस जखमी

597

अवजड वाहतूक आणि त्यातून होणारे अपघात यामुळे सतत चर्चेत आणि अशांत असणाऱ्या उरण तालुक्यातील अवजड वाहतूकीचा फटका पोलिसांनाही बसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उरण परिसरातील अनेक पोलिसांचे अवजड वाहतूकीमुळे अपघात झाले आहेत. कामावर जाणाऱ्या रमेश शंकर घुगरे (35) या पोलिसाच्या दुचाकीला अवजड वाहनांने उडविले. या अपघातात रमेश घुगरे याच्या मांडीचे आणि पायाचे हाड मोडले असून ते जखमी झाले आहेत.

बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणाऱ्या बिर्जूदेव जग्गनाथ कुकडे या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. उरण तालुका हा अपघातांचा तालुका म्हणून ओळखला जातो. प्रचंड अवजड वाहतूकीमुळे येथे नेहमी अपघात घडतात. गेल्या काही वर्षात उरण तालुक्यातील रस्त्यांवर हजारो तरूणांचे अपघातात बळी गेले आहेत. अवजड वाहतूक बंद करावी किंवा या अपघातांवर नियंत्रण येईल अशी उपाययोजना करावी यासाठी सतत आंदोलने आणि मोर्चे सूरू असतात. मात्र, प्रशासन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून अवैध पार्कींग आणि बेकायदेशीर वाहतूकीला प्रोत्साहन देते. त्यामुळे अनियंत्रीत वाहतूक वाढून अपघात होतात. अशा या अनियंत्रीत वाहतूकीमुळे नुकतेच दोन तरूणांचा अपघातात मृत्यू झाला होता. या बेकायदा अवजड वाहतूकीमुळे पोलिसाचाच अपघात झाल्यामुळे अवजड वाहतूक रोखण्याची मागणी होत आहे. अवजड वाहनांमुळे या भागात गेल्या काही दिवसांत अनेक अपघात झाले आहेत. या वाहतूकीला शिस्त लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कुठल्याही रस्त्यावर बेकायदा वाहन उभे करून ठेवल्यास त्याच्यावर दंडात्मक आणि कायदेशिर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या