कोळंब पुलावरील लोखंडी कमानीला अज्ञात वाहनांची धडक 

44
सामना ऑनलाईन । मालवण प्रतिनिधी 
मालवण-आचरा या प्रमुख मार्गावरील धोकादायक बनलेल्या कोळंब पुलावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी उभारण्यात आलेली लोखंडी कमान अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रावरी (२०) सायंकाळी कोसळली . मालवणहून आचरेच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी मालवाहक वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर ही घटना घडली. अपघातात वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र अपघातग्रस्त वाहनाने घटनास्थळावरुन पोबारा केल्याचे काही प्रत्यक्षदर्शी व दुसरी कमान उभारण्याचे काम करणाऱ्या बांधकाम कर्मचारी यांनी सांगितले.
पुलावरून अवजड वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली होती. पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक झाल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरणार असल्याचा अहवालही प्रांताधिकारी कार्यालयाकडून बांधकाम विभागाकडे देण्यात आला होता. त्यामुळे पुलावरुन मालवाहक वाहनाच्या वाहतुकीवर बांधकाम विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसात तक्रार देण्याची कार्यवाई सुरु असल्याची माहिती बांधकाम विभागाचे उप अभियंता पी. डी. पाटील यांनी दिली.
कोळंब पूल धोकादायक बनल्याने बुधवारी पुलाच्या एका बाजूला आठ फुट उंचीची लोखंडी कमान उभारण्यात आली. तर दुसरी कमान उभारणीचे काम मालवणच्या दिशेने सुरु आहे. असे असताना बुधवारी कोल्हापूर येथील मालवाहक वाहन मालवणहून आचरेच्या दिशेने जात असताना अपघात घडला.
 
दिशा दर्शक फलक नाहीत 
अवजड वाहतूक पुलावरून बंद करण्यात आली. मात्र पर्यायी मार्ग दर्शवणारे दिशा दर्शक फलक नसल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे. कोळंब पूल, देऊळवाडा, आडारी, कातवड फाटा, ओझर तिठा आदी ठिकाणी फलक लावणे आवश्यक आहे. आचारा मार्गावरून मालवणला येताना ओझर मार्गावर दिशादर्शक नसल्याने अनेक वाहने येतात. त्यात देवगड व अन्य मार्गावरून येणाऱ्या सहलीच्या गाड्यांचाही समावेश आहे. त्यांना पुन्हा मागे परतावे लागते.
आपली प्रतिक्रिया द्या