पुणे-नाशिक महामार्गावर अपघात; ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे, चालक ठार; अन्य तिघे गंभीर जखमी

पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात पिकअपने ट्रक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. सकाळी झालेल्या या भीषण अपघातात ट्रक्टरचे दोन तुकडे झाले, तर चालक जागीच ठार झाला. अपघातस्थळापासून रस्त्याने पायी जाणारी तीन मुले या अपघातात गंभीर जखमी झाली.

संतोष नारायण शिंदे (वय 50, रा. उंब्रज, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या ट्रक्टरचालकाचे नाव आहे. तर अनुराग बाबाजी गोडे, अपेक्षा दत्तात्रय गोडे, राणी लहू लोहकरे अशी जखमी मुलांची नावे आहेत.

याबाबत घारगाव पोलिसांनी माहिती दिली. आज सकाळी संतोष शिंदे हे ट्रक्टर सर्व्हिसिंगसाठी आळेफाटामार्गे संगमनेरच्या दिशेने जात होते. पुणे-नाशिक महामार्गावरील डोळासणे शिवारातील पेट्रोल पंपासमोर पिकअपने ट्रक्टरला पाठीमागून धडक दिली. या धडकेत ट्रक्टरचे दोन तुकडे झाले, तर संतोष शिंदे हे जागीच ठार झाले. याचवेळी त्या ठिकाणाहून पायी जाणाऱया तीन मुलांनाही धडक बसली.  त्यामुळे अनुराग बाबाजी गोडे, अपेक्षा दत्तात्रय गोडे, राणी लहू लोहकरे हे तिघेही जखमी झाले आहेत. अपघातानंतर पिकअपचालक फरारी झाला. अपघाता नंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुलांना रुग्णालयात दाखल केले. डोळासणे महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पंढरीनाथ पुजारी, भरत गांजवे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. टोलनाक्याचे कर्मचारीही क्रेन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या माध्यमातून अपघातग्रस्त ट्रक्टर महामार्गावरून बाजूला घेण्यात आला. भीषण अपघात ट्रक्टरचे दोन तुकडे झाले होते. याप्रकरणी अंबादास मुरलीधर हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.