अपघातानंतर जखमी व्यक्तीला गाडीसोबत १७ किमी फरफटत नेले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीतील नोएडा भागात एका भरधाव एसयूव्ही चालकाने एका व्यक्तीला धडक देत त्याला तब्बल १७ किमी फरफटत नेल्याचे समोर आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात पीडित व्यक्ती त्या एसयूव्ही गाडीच्या चेसीसला अडकल्याचे दिसत आहे. पोलीस सध्या त्या एसयूव्ही चालकाचा शोध घेत आहे.

तब्बल महिन्याभरापूर्वी सुखपाल सिंग या ४२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नोयडा येथे सापडला होता. सुखपाल हे मोटारसायकलवरुन घरी परतत होते. मात्र उशिरा घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधशोध केली. तेव्हा धुम मनिकपूर येथे सुखपाल यांची मोटरसायकल सापडली. त्यानंतर पोलीसांत तक्रार दाखल केल्यानंतर तेथून १७ किमी अंतरावर सुखपाल यांचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आढळला. पोलिसांना महामार्ग ९१ वरील पेट्रोल पंपाचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून त्यात एका सफेद रंगाच्या एसयूव्हीच्या चेसिसला सुखपाल यांचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत दिसत आहे.

सुखपाल यांना धडक दिल्यानंतरही एसयूव्ही चालकाने गाडी थांबविली नाही. धडक दिल्यानंतर सुखपाल एसयूव्हीच्या चेसीसला अडकले. तरीही चालक गाडी घेऊन १७ किमी पर्यंत गेला. त्याने एका पेट्रोल पंपवर पेट्रोलदेखील भरले. त्यानंतर काही अंतरावर गेल्यावार त्याने सुखपालला गाडी खालून बाहेर काढले व त्यांचा मृतदेह झुडुपात टाकून पळ काढला. दरम्यान त्या एसयूव्ही चालकाने ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले तेथील सीसीटीव्ही फुटेजमधूल हा प्रकार उघडकीस आला आहे. सध्या आम्ही त्या एसयूव्ही चालकाचा शोध घेत आहोत. त्याचा गाडी क्रमांक आमच्या हाती लागला असून लवकरच त्याला अटक करू, असे बादलपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी सुरेंद्र कुमार भाटी यांनी सांगितले.