लष्कर परिसरातील भंगार वेचकाच्या खुनाची उकल, गुन्हे शाखा युनिट दोनकडून आरोपीला अटक

भंगार वेचकाचा खून केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनने आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. नशा करण्यास विरोध केल्यामुळे आणि नातेवाईकाला उलटसुलट माहिती दिल्याच्या रागातून तरुणाने भंगार वेचकाचा खून केल्याची कबुली दिली आहे. मोहंमद आझाद सुक्कसाब शाह (21, रा.मोदिखाना, लष्कर, मुळ बिजनोर, उत्तरप्रदेश ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. इस्माईल शेख (60) असे खून झालेल्याचे नाव आहे.

लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंगार वेचक इस्माईल शेख यांच्या खुनाचा तपास गुन्हे शाखा पथक दोन कडून करण्यात येत होता. प्रभारी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी तपासासाठी दोन पथके तयार करून शोध सुरू केला होता. भंगार वेचक इस्माइलचे वर्तन व्यवस्थित असल्याचे आजूबाजूच्या लोकांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांचा खुन कोणी व कोणत्या कारणासाठी केला याची माहिती पथकाकडून घेण्यात येत होती. दरम्यान, खून झालेल्या ठिकाणी जवळच राहणाऱ्या मोहमंदची इस्माइल यांच्यासोबत भांडण झाल्याची माहिती पोलीस नाईक मोहसिन शेख यांना मिळाली. त्यानुसार पथकाने मोहंमद शाहला ताब्यात घेतले.

सुरुवातीस त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पथकाने कसुन तपास केल्यानंतर त्यानेच गुन्हा केल्याची कबुली दिली. इस्माईल वारंवार टोचुन बोलत होता. त्या ठिकाणी नशा पाणी करून देत नव्हता, तु तुझ्या गावाला उत्तर प्रदेशला परत जा, असे बोलत होता. त्याशिवाय भाभीला उलटसुलट सांगत असल्याचा राग आल्यामुळे इस्माइलचा खून केल्याची कबुली मोहमंदने दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, यशवंत आंब्रे, किशोर वग्गु, नामदेव रेणुसे, मोहसिन शेख, उत्तम तारु, चेतन गोरे, समिर पटेल, मितेश चोरमोले, गोपाल मदने यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या