भाजी व्यवसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणीची मागणी , बोगस पत्रकाराला अटक

शहरातील एका भाजी विक्रेत्याला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून यु ट्यूब न्युज चॅनेल आणि संघटनेच्या नावाखाली ब्लॅक मेलिंग करणाऱ्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी संघटनेच्या प्रमुखास अटक केली असून संबंधीत यु ट्यूब न्यूज चॅनेलच्या चालकावरही गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये आणखी दोघांचा समावेश असून त्यांच्याकडे सीबीआय अधिकारी असल्याची बनावट ओळखपत्रही सापडली आहेत. शिवप्रहार संघटनेच्या अनिल बोटे (रा.कोंढवा ) याला अटक केली आहे. महाराष्ट्राचा प्रहार न्यूजच्या राहूल हरपळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 38 वर्षीय भाजीविक्रेत्याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व्यक्तीचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून 10 सप्टेंबरला त्यांना ओळखीच्या स्वप्निल धोत्रेने फोन करुन पबला जाण्यासाठी बोलवले होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रहार न्यूजचा राहुल हरपळ दोन मुलींना घेऊन ते कोरेगाव पार्कमध्ये पबला गेले. तेथे आरोपी अनिल बोटे अगोदरच आला होता. त्याठिकाणी फिर्यादीची एका मुलीसोबत जवळीक झाल्यामुळे त्यांनी रस्त्यात पावभाजी खाल्ली. त्यानंतर दोघांनी एका लॉजवर जाऊन शरीरसंबंध ठेवले. दरम्यान दोन दिवसांनातर फिर्यादींच्या भाजीच्या दुकानावर राहुल हरपळे, अनिल बोटे, स्वप्निल धोत्रे व एक मुलगी आली. त्यानंतर अनिल बोटे याने तू मुलीवर बलात्कार केला आहेस, आम्ही तुझ्याविरुध्द पोलिसात तक्रार देणार आहोत. तक्रार करायची नसेल तर पाच लाख रुपये आणून दे अशी मागणी फिर्यादीकडे केली.

फिर्यादी हे अनिल बोटेला समजाविण्यासाठी महाराष्ट्र प्रहार न्यूजचा पत्रकार राहुल हरपळे याच्या हडपसर मेगा सेंटरमधील कार्यालयात गेले होते. तेव्हा पैसे न आणल्याने बोटेने फिर्यादीला शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात खुर्ची उचलून मारली. तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो व माझ्या संघटनेची काय ताकद आहे हे दाखवतो अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत फिर्यादींनी घर गाठले. त्यानंतर फिर्यादींचा मित्र स्वप्निल माने याने त्यांना फोन करून सांगितले की, अनिल बोटे हा त्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गेला आहे. त्यानंतर फिर्यादींनी स्वतः पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

बोगस युटयूब चॅनेलचा सुळसुळाट

हडपसर परिसरात युट्यूब व इतर संघटनांच्या नावाखाली बोगस पत्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्याकडून अनेकांना ब्लॅकमेलिंग केले जाते. यासंदर्भात कोणाच्या तक्रारी असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन हडपसर पोलिसांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या