जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर आरोपी घटनेच्यावेळी अल्पवयीन असल्याचे कागदोपत्री पुराव्याने सिद्ध झाले. त्याची नोंद करुन घेत उच्च न्यायालयाने या आरोपीची सुटका करण्याचे आदेश दिले. गेली साडेआठ वर्षे हा आरोपी कारागृहात होता.
हत्येसाठी दोषी धरत सोलापूर सत्र न्यायालयाने 22 मार्च 2018 रोजी या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. घटना घडली तेव्हा मी अल्पवयीन होतो. माझी जन्मठेप रद्द करावी, अशी मागणी या आरोपीने केली होती. न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या. शाम चांडक यांच्या खंडपीठासमोर या आरोपीच्या याचिकेवर सुनावणी झाली.
घटनेच्यावेळी अल्पवयीन असल्याची कागदपत्रे आरोपीने न्यायालयात सादर केली. त्याची सत्यता पडताळणीचे आदेश खंडपीठाने पोलिसांना दिले होते. कागदपत्रात दोष नसल्याचे सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने आरोपीची मागणी मान्य केली.
अल्पवयीन असल्याचा दावा कधीही करता येतो
घटनेच्यावेळी अल्पवयीन होतो हा दावा आरोपी कधीही करू शकतो. शिक्षा ठोठावल्यानंतरही हा दावा करता येतो. घटना घडली तेव्हा याचिकाकर्ता आरोपी अल्पवयीन होता हे कागदपत्रांवरून सिद्ध झाले आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
अवघ्या एका महिन्यामुळे सुटला
अल्पवयीन असल्याचे सिद्ध करण्यासाठी आरोपीने जन्म व शाळा सोडल्याचा दाखला सादर केला होता. त्यानुसार घटना घडली तेव्हा त्याचे वय 15 वर्षे व 11 महिने होते. 16 वर्षांचा आरोपी सज्ञान म्हणून ग्राह्य धरला जातो. याचिकाकर्ता आरोपीने सादर केलेले दोन्ही दाखले निसंदेह असल्याचे स्पष्ट झाले.
काय आहे प्रकरण
आरोपीवर हत्येचा आरोप होता. 20 डिसेंबर 2015 रोजी ही घटना घडली. आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. सोलापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा, असे आदेश सत्र न्यायालयाने दिले. त्याविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली होती.