उत्तर प्रदेशात खळबळजनक घटना समोर आली आहे. अमेठीत घरात घुसून शिक्षकाच्या कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपीने हत्या करण्याआधी व्हॉट्सअपवर ‘पाच जण मरणार’ असे स्टेटस ठेवले होते. त्यानंतर घरात घुसून चौघांना संपवले. चंदन वर्मा असे आरोपीचे नाव आहे.
मयतांमध्ये शिक्षक, त्याची पत्नी आणि दोन मुलींचा समावेश आहे. चौघांची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला. पोलीस चौकशीत आरोपीने आपल्याला केलेल्या कृत्याचा पश्चाताप असल्याची कबुली दिली. तसेच शिक्षकाच्या दोन लहान मुलींना संपवणे ही आपली चूक झाल्याचे आरोपीने म्हटले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकाच्या पत्नीचे आरोपीसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. या कारणातून आरोपीने अमेठीतील शिक्षक सुनील कुमार यांच्या घरात घुसून चौघांची हत्या केली. हत्येपूर्वी आरोपीने व्हॉट्स अप ठेवले होते. ‘पाच जण मरणार आहेत, मी लवकरत तुम्हाला दाखवेन’ असे स्टेटस आरोपीने ठेवले होते.
चौघांच्या हत्येनंतर आरोपी चंदन स्वतःला संपवणार होता. मात्र हत्याकांडानंतर आरोपी पळून गेला. पोलिसांनी कसून शोध घेत त्याला शुक्रवारी अटक केली. यानंतर आरोपीने हत्या करण्यासाठी वापरलेली पिस्तुल जप्त करण्यासाठी गेले असता पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. यानंतर रविवारी पोलिसांनी पत्रकार परिषद घेत हत्याकांडाची सविस्तर माहिती दिली.