बाबा सिद्दिकींची हत्या करणारे शूटर उत्तर प्रदेशातील, सुपारीसाठी पुन्हा निवडले युवकांना; अतिक अहमद स्टाइल हत्या

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या करणारे शूटर उत्तर प्रदेशच्या बहराइच येथील असल्याचे उघड झाले आहे. हत्येची सुपारी देण्यासाठी पुन्हा एकदा युवकांनाच निवडण्यात आल्याचे समोर आले असून बाबा सिद्दिकी यांची उत्तर प्रदेशातील माफिया अतिक अहमदस्टाईल हत्या करण्यात आली आहे. फरक इतकाच आहे की अतिक अहमद याची हत्या पोलीस बंदोबस्तात झाली आणि बाबा सिद्दिकी यांची हत्या पोलिसांचे संरक्षण असताना झाली.

दरम्यान, सिद्दिकी यांच्या हत्येचे यूपी कनेक्शन या ठिकाणी उघड झाले असून अशा प्रकारे एनडीए सरकारच्या कार्यकाळात सुपाऱ्या देऊन हत्या घडवून आणण्यासाठी 18 ते 19 वर्षांच्या युवकांचा वापर करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या दोघांचे कोणत्याही प्रकारचे क्रिमिनल रेकॉर्ड नाही.

सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या तीनपैकी दोन आरोपी उत्तर प्रदेशच्या बराइचचे असल्याची खातरजमा पोलिस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी केली आहे. एकाचे नाव धर्मराज असून दुसऱ्याचे शिवकुमार ऊर्फ शिवा असे नाव आहे. धर्मराज याला पोलिसांनी पकडले असून शिवा फरार आहे. दोघेही उत्तर प्रदेशातील गंडारा गावचे असून त्यांची घरेही आजूबाजूला आहेत. दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील असून ते पुण्यात भंगार विक्रेत्याचे काम करत होते. त्यांचे कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी रेकॉर्ड समोर आलेले नाही. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. हत्येबद्दल दोघांच्या कुटुंबीयांना काही माहिती होते का? याबाबतची चौकशी पोलीस करत आहेत.

भंगार व्यावसायिकाकडे काम करत होते शूटर

शिवा सहा वर्षांपासून पुण्यातील भंगार व्यावसायिकाकडे काम करत होता. शिवाने दोनच महिन्यांपूर्वी धर्मराजलाही पुण्यात कामासाठी बोलावून घेतले होते. सुपारी देणाऱ्या व्यक्तीने शिवा आणि धर्मराज यांची तिसरा शार्पशूटर हरयाणाच्या गुरमैल बलजीत सिंह (23) याच्याशी भेट घडवून आणली होती. त्यानंतर हत्येची सुपारी मिळाली होती.

40 दिवसांपासून मुंबईत रेकी

शूटर्स गेल्या 40 दिवसांपासून मुंबईत राहून सिद्दिकींची रेकी करत असल्याचे समोर आले आहे. 2 सप्टेंबर रोजी कुर्ल्यात त्यांनी एक खोली भाड्याने घेतली होती. पकडण्यात आलेल्या शिवा आणि गुरमैल या दोन शूटर्सनी सांगितले की, त्यांनी बाबा सिद्दिकी यांचे घर आणि मुलाच्या कार्यालयाची रेकी केली होती. दरम्यान, हे कॉण्ट्रक्ट किलिंग असून सुपारी देऊन बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. मात्र सुपारी कुणी दिली, किती रुपयांची दिली याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कुटुंबीय म्हणाले, आमची मुले निर्दोष

धर्मराज आणि शिवा यांच्या कुटुंबीयांच्या पोलीस चौकशीत त्यांनी आमची मुले चुकीचे काम करूच शकत नाहीत असे म्हटले आहे. त्यांचा ब्रेन वॉश केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शिवासोबत माझे 15 ते 20 दिवसांपूर्वी बोलणे झाले होते. माझ्याकडे फोन नव्हता. शिवाने 15 दिवसांपूर्वी त्याच्या मित्राकडे माझ्यासाठी फोन पाठवला. आम्ही शिवाला सांगितले की, लवकर घरी ये. यावर होळीत घरी येईन असे त्याने सांगितल्याचे शिवाचे वडील म्हणाले. तर धर्मराजचे वडील म्हणाले अनुराग आणि धर्मराज ही माझी दोन मुले असून मुलगी नाही, अशी माहिती पोलिसांना दिली. आम्हाला काहीच माहीत नाही. धर्मराज दोन महिन्यांपूर्वी आला होता. दिल्लीला जाऊन येतो असे सांगून पहिल्यांदा बाहेर पडला, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

बिष्णोई गँगने 2020-21 पर्यंत खंडणीतून कोट्यवधी रुपये कमावले आणि तो पैसा हवालाद्वारे परदेशात पाठवला गेला, असे ‘एनआयए’ने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. बिष्णोई गँग उत्तर भारत, पंजाब, उत्तर प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि झारखंडमध्ये पसरल्याचे ‘एनआयए’ने म्हटले आहे. दरम्यान, सतविंदर सिंग ऊर्फ गोल्डी ब्रार हा कॅनडाच्या पोलीस आणि हिंदुस्थानी एजन्सीला हवा आहे, तो बिष्णोई गँग चालवत आहे.

बिष्णोईकडे 700 हून अधिक शूटर्स

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेणारा लॉरेन्स बिष्णोई दाऊदच्याच वाटेवर असल्याचे समोर आले आहे. दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीप्रमाणे बिष्णोई गँगनेही किरकोळ गुह्यांनी सुरुवात केली. त्यानतंर त्यांनी स्वतःची गँग तयार केली. बिष्णोई आणि गोल्डी ब्रार या गँगवर एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणा सातत्याने कारवाई करत असून एनआयएने गँगस्टर टेरर प्रकरणात बिष्णोई, गोल्डी ब्रार यांच्यासह अनेक कुख्यात गँगस्टरवर आरोपपत्र दाखल केले आहे. बिष्णोईकडे 700 हून अधिक शूटर्स आहेत. त्यापैकी 300 पंजाबशी संबंधित आहेत. बिष्णोई आणि गोल्डी ब्रार यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून प्रचार झाला.

महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था कोलमडली – राहुल गांधी

बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचेच दिसून येत आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि बाबा सिद्दिकींना न्याय मिळाला पाहिजे अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरून बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

वडेट्टीवार यांचे पोलीस महासंचालकांना पत्र

बाबा सिद्दिकी यांची हत्या म्हणजे सिद्दिकी यांना दिलेली सुरक्षा यंत्रणा, इंटीलिजन्स यंत्रणा कुचकामी ठरली असेच म्हणावे लागेल. गृह विभाग कायदा-सुव्यवस्था राखण्यात सर्व आघाड्यांवर अपयशी ठरला आहे. खरं तर मुंबई पोलीस दलाचा लौकिक जगभरात आहे. स्कॉटलंड यार्ड पोलीस दलाच्या बरोबरीने आपला लौकिक आहे. असं असताना मुंबईत हत्या होत आहेत. हे मुंबई पोलीस दलाला शोभा देणारे नाही, अशी खंत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून व्यक्त केली.

पुण्यातून एकाला अटक

बिष्णोई गँगशी संबंधित असणाऱ्या आणि बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट लिहिल्याचा संशय असणाऱ्या शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर याला रविवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शुभम पसार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.