पोलिसांना बघून आरोपीचा धावत्या एक्स्प्रेसमधून उडी टाकण्याचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पळणाऱया आरोपीच्या शिवडी पोलिसांनी फिल्मीस्टाईलने मुसक्या आवळल्या. आरोपी गुन्हा करून तामीळनाडूला पळण्याच्या प्रयत्नात होता. त्याने नागरकोईल एक्सप्रेसदेखील पकडली; पण तो मुंबईची हद्दसुद्धा पार करू शकला नाही.

रे रोड येथील दारूखाना परिसरात राहणारी 14 वर्षांची मुलगी घरात एकटीच असल्याचे हेरून आरोपी संजीवीकुमार संभुलिंगम (25) हा घरात घुसला. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच कुठे वाच्यता केलीस तर ठार मारेन असेही धमकावले. त्यानंतर त्याने सीएसएमटी स्थानक गाठून तामीळनाडूला निघालेली नागरकोईल एक्सप्रेस पकडली. हे शिवडी पोलिसांना समजताच सपोनि स्नेहलसिंग खुळे तसेच देशमुख, जाधव, आठरे, धायगुडे, माळोदे या पथकाने लगेच दुचाकीवरून दादर रेल्वे स्थानक गाठले.

दादरमधून एक्सप्रेस सुटणार तेवढय़ात धावत जाऊन पथक गाडीत शिरले. मग धावत्या एक्सप्रेसमध्येच संजीवीकुमारचा शोध सुरू केला. पथक एस 7 या बोगीत येताच त्यांना बघून संजीवीकुमारची पाचावर धारण बसली आणि मुलुंड-ठाणेदरम्यान गाडी धिमी असताना त्याने उडी टाकण्याचा प्रयत्न केला; पण खुळे व पथकाने त्याचा उडी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न हाणून पाडत त्याला वेळीच अटकाव केला.