रामेश्वराने कौल दिला… आचरे गाव पुन्हा भरला

873

गेले तीन दिवस सुरू असलेल्या आचरा गावच्या गावपळणीची रविवारी (१५) चौथ्या दिवशी रामेश्वराच्या आदेशाने (कौल) सांगता झाली.

श्री देव रामेश्वराने कौल देताच तोफही धडाडली. तोफेचा आवाज आसमंतात घुमला आणि वेशीबाहेर मुक्काम ठोकलेल्या ग्रामस्थांनी गावची वाट धरली. गेले तीन दिवस सुने सुने असलेले आचरा गाव पुन्हा गजबजले.

शेकडो वर्षांची परंपरा जोपासत आचरा गावातील ग्रामस्थांनी गावपळणीनिमित्त गाव सोडून गेले तीन दिवस व तीन रात्री गावच्या वेशीबाहेर आपला संसार थाटला होता. १२ डिसेंबर दुपारी ग्रामदैवत श्री देव रामेश्वराने गावपळणीसाठी गाव सोडण्याचा आदेश ग्रामस्थांना दिला होता. त्यामुळे आचरे वासीयांनी आपल्या पाळीव प्राण्यांसह गावच्या वेशीबाहेर झोपड्या व राहुट्या उभारून आपला संसार थाटला होता. गेली शेकडो वर्षे ही परंपरा ग्रामस्थ जोपासतात.

निसर्गाच्या सान्निध्यात तीन दिवस तीन रात्री आचरे ग्रामस्थ रमले होते. तर काही ग्रामस्थ नातेवाईकांच्या निवासस्थानी वास्तव्याला राहिले होते. याकाळात धम्माल मस्ती मौजमजा करत तीन दिवस आनंदात घालविले होते. महिलांनी फुगडी,संगीत खुर्ची गरब्याच्या तालावर ठेका धरला होता तर भजन पारंपरिक कलांबरोबर फनी गेम्स, पत्यांचे डाव, कबड्डी, क्रिकेट या मैदानी खेळांचा आधार घेत बच्चे कंपनी व तरुण वर्ग जल्लोषात रंगली होती.

गावपळणीचे तीन दिवस पूर्ण झाल्याने रविवारी दुपारी गावपळणीच्या चौथ्या दिवशी दुपारी २ वाजता प्रथेप्रमाणे बारा पाच मानकरी व ग्रामस्थ यांनी श्री देव रामेश्वर मंदिरात येवून देवाला गाव भरविण्याबाबत कौल लावला. सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास देवाने गाव भरविण्याच्या बाजूने कौल दिल्यावर मंदिर परिसरात इशाऱ्याची तोफ वाजविण्यात आली. तोफेचा आवाज आसमंतात घुमल्याने वेशी बाहेर असणाऱ्या ग्रामस्थांपर्यंत गाव भरण्याची सूचना पोहचल्यावर ग्रामस्थांनी गावात येण्यास सुरुवात केली.

 ग्रामस्थांनी सामानाची आवराआवर करत गावची वाट धरली. कुणी डोक्यावरून तर कुणी बैलगाडी, टेंपोतून, दुचाकीवरून, रिक्षातून वेशीबाहेर नेलेले सामान आणण्यासाठी धावपळ करू लागले होते. गुरेढोरे कोंबडीकुत्री पुन्हा गावात आणण्यासाठी गुंतले होते. संध्याकाळपर्यंत गेले तीन दिवस शांत झालेला गाव पुन्हा गजबजून गेला. निर्मनुष्य झालेले रस्ते ग्रामस्थांच्या वर्दळीने गजबजून गेले. गावात दाखल झाल्यावर ग्रामस्थानी आपली बंद असलेली घरे उघडून घराची व परिसराची स्वच्छता केली. गेल्या तीन दिवसात निसर्गाच्या सानिध्यात लुटलेल्या आनंदाची शिदोरी घेऊन नव्या उत्साहाने आचरा वासिय पुन्हा आपल्या दैनंदिन कामात गुंतणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या