वेदनांची व्यथा

63

<<  प्रेरणा >>       << दीपक पवार >>

अॅसिड हल्ल्याला बळी पडलेली बंगळुरूची हसीना हुसेन. या हल्ल्याने दिलेल्या जीकघेण्या दुखापती, शरीरभर पसरलेल्या जखमा क कुरूपतेचा साज समाजापासून न लपवता तिने तिचा लढा सुरू ठेवला आहे. तिच्या  सक्षमतेचा हा प्रेरणादायी लढा. 

ऑसिडवर बंदी घालण्यात अर्थ नाही

अॅसिडवर बंदी घालण्यात अर्थ नाही. मी माझ्यावर हल्ला करणाऱ्याला शिक्षा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. अखेर त्याला आजीवन कारावासाची शिक्षा झाली आणि मला न्याय मिळाला. अॅसिडवर बंदी घालण्यासाठीही याचिका दाखल झाल्या, परंतु सर्वसामान्यांना विविध कामांमध्ये अॅसिडचा वापर करावा लागतो. त्यामुळे अॅसिडवर बंदी घालण्यात अर्थ नाही. याउलट पुरुषांनीच आपली मानसिकता बदलायला हवी याकडे हसीनाने लक्ष वेधले.

अॅसिड हल्ल्यानंतरचे आयुष्य भयंकर असते… तुमचा सगळा चेहराच विद्रूप होऊन जातो… त्यानंतर पावडर, लिपस्टीक करता येत नाही… अनेकांचे डोळे जातात… नाकाचा पत्ता राहत नाही… आरसाही भयानक वाटायला लागतो… १५ वर्षांपूर्वी बंगळुरूच्या हसीना हुसैन या रणरागिणीने आपल्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्याची आपबिती सांगितली आणि अॅसिड हल्ल्याने उद्ध्वस्त झालेलं एक आयुष्य समोर आलं. अॅसिड हल्ला झाल्यानंतरच्या व्यथा मांडतानाही एक निर्लेप दिलखुलास हसू हसीनाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. हे हसू म्हणजे तिचा नियतीवरचा, या विकृत मनोवृत्तीवरचा विजयच म्हणायला हवा. जगण्याचा लढा आपल्या कृतीतून  व्यक्त करणाऱ्या हसीनाची ही प्रेरणादायी कथा.

२० एप्रिल १९९९… हा दिवस हसीनाच्या आयुष्याला वेगळे वळण देणारा ठरला. त्या काळ्या दिवसानंतर तिचे आयुष्य बदलले. त्या दिवशी तिच्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्याने ती कोसळली, खचली पण कोलमडली नाही. जगण्याच्या जिद्दीने तिने संघर्ष केला आणि या चढउतारांतून आज ती सर्वांसाठी आदर्श ठरली आहे. जे घडले त्यात तिची चूक नव्हती, पण त्याची शिक्षा मात्र तिला भोगावी लागली, भोगावी लागतेय. ही सल तिच्या मनात आहेच.

चेहरा व शरीरभर असलेल्या असंख्य जखमांची तमा न बाळगता हसीना स्वतःचा संघर्ष उलगडते. ”या हल्ल्यानंतर आपले संपूर्ण आयुष्यच बदलून गेले होते. मी पूर्णपणे कोलमडून पडले. माझे दोन्ही डोळे गेले, अंधत्व आले. जोसेफ नावाच्या व्यक्तीकडे मी डेटा एण्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत होते. काही काळानंतर मी त्याचे काम सोडत असल्याचे त्याला सांगितले, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. त्याला न सांगता मी परस्पर त्याचे काम सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याने मनात राग धरला होता. त्याचा पुरुषी अहंकार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. मी असा जॉब सोडूच कसा शकते… असे त्याने वारंवार मला विचारले. मी माझ्या निर्णयावर ठाम होते. एके दिवशी त्याने मला गाठून माझ्या चेहऱ्यावर आणि अंगावर अॅसिड फेकले. मी तडफडत होते. तब्बल ७५ टक्के भाजले होते. माझे डोळेही अक्षरशः भाजून निघाले होते. वर्षभर मी पलंगावर पडून होते. मला धड चालताही येत नव्हते. या घटनेचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. प्रचंड मानसिक धक्का बसला होता, पण माझ्या आईवडिलांनी मला जगण्याची प्रेरणा दिली.”

आज हसीना स्वतःच्या पायावर उभी आहे. व्यक्तिमत्त्व विकास, कम्प्युटर स्कील अशा प्रकारच्या विविध अभ्यासक्रमाचे तिने प्रशिक्षण घेतले आहे. शरीराच्या वेदनांबरोबरच आपल्या वाट्याला आलेल्या अंधत्वावरही तिने मात केली आहे. अंधांचे जगणे समजून घेत हसीनाने त्यांच्यासाठी आयुष्यभर काम करण्याचा निर्णय घेतला. हसीना गेल्या कित्येक वर्षांपासून कर्नाटकमधील नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड या संस्थेसाठी काम करते.

स्वत:च्या वाटय़ाला आलेली खडतर वाट इतरांसाठी काहीशी सुकर करण्यासाठी, अॅसिड हल्ले रोखण्यासाठी दिल्या जाणाऱ्या न्यायालयीन लढाईत हसीना सक्रिय आहे. ती म्हणते जो समाज आम्हाला वेगळं समजत होता, आमच्याविषयी हळहळ व्यक्त करत होता आज तोच या लढ्यामुळे आम्हाला सन्मान देत आहे.

अॅसिड हल्ला झालेल्या अशा काहीजणींनी स्वतःला सक्षम करत आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं आहे. हसीनाची ही कथाही अशाच प्रेरणादायी कथांपैकी. पण तिच्यासाठी हा प्रवास सोपा निश्चितच नव्हता. चेहराच नव्हे तर शरीरभर पसरलेल्या जखमा व कुरूपतेचा साज समाजापासून न लपवता तिचा लढा सुरूच आहे, पण प्रश्न हाच उरतो की केवळ नकार दिला म्हणून मुली-स्त्रीयांवक, कुटुंबात बायकोवर किंवा अगदी डोईजड होईल या भीतीने, आकसापोटी दुर्बल व्यक्तींवर ऑसिड टाकून त्यांना संपवून टाकण्याची क्रूर वर्चस्ववादी कृती समाजातून कधी नाहीशी होणार?

 

आपली प्रतिक्रिया द्या