कळव्यात महिलेवर सामूहिक बलात्कार करून ऑसिड फेकले

सामना ऑनलाईन, ठाणे

महिलांवरील अत्याचाराच्या विविध घटनांनी महाराष्ट्र हादरला असतानाच आज क्रौर्याने अक्षरश: कळस गाठला. कळव्यातील एका ३२ वर्षीय विवाहित महिलेवर घरात घुसून सहा नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एवढेच नव्हे तर तिच्यावर ऑसिड फेकून ते सर्वजण पसार झाले असून या घटनेने अवघे ठाणे शहर हादरले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असून पोलीस त्या नराधमांचा शोध घेत आहेत. या अत्याचाराबाबत कोणाकडे ब्र काढल्यास पतीसह त्या महिलेला ठार मारण्याची धमकीही दिल्याने तिचे अवघे कुटुंब भयभीत झाले आहे.

मूळची तेलंगणाची असलेली ती दुर्दैवी महिला कळव्याच्या घोलाईनगरमधील  साईदर्शन या चाळवजा सोसायटीत दोन मुले, एक मुलगी व पतीसह राहते. दोघेही पती-पत्नी अतिशय गरीब असून ते यल्लमा देवीचा जोगवा मागून आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. गेल्या काही दिवसांपासून त्याच भागात राहणाऱया सहाजणांच्या टोळक्याची तिच्यावर पाळत होती. पती बाहेर कामासाठी गेल्याची संधी साधून ते टोळके आज संध्याकाळी पाचच्या सुमारास घरात घुसले. तीन लहान मुलांना त्यांनी बांधून ठेवले व सर्वांनी त्या महिलेवर मुलांसमोर बलात्कार केला. लहान मुले ओरडत होती तरीही त्या नराधमांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. त्या महिलेवर ऑसिड फेकून सर्वजण पळून गेले.

भाषेची अडचण

भयभीत झालेल्या त्या महिलेने आपल्या पतीला फोनवर ही माहिती दिली. पतीने एकता महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांना कळवले. स्थानिक महिलांनी धाव घेऊन पीडित महिलेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण तिला मराठी तसेच हिंदी भाषाही येत नव्हती. अखेर पोलिसांना बोलावून तिला कळवा रुग्णालयात दाखल केले.

तरीही पोलिसांनी दखल घेतली नाही

ते सहाजण त्या महिलेच्या परिचित असून तेलंगणाचेच असल्याचे समजते. २०१५ मध्ये याच टोळक्याने तिचा विनयभंग केला होता. तशी तक्रारही पोलीस ठाण्यात दाखल केली होती पण त्याची दखल घेण्यात आली नव्हती. अखेर आज तिच्यावर काळाकुट्ट प्रसंग ओढवला.

आपली प्रतिक्रिया द्या