ग्रामीण भागात अवैध धंदे आढळल्यास आता पोलिसांवरच कारवाई – दीपक केसरकर

64

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

राज्याच्या ग्रामीण भागात असलेल्या दारू, जुगार, मटका, गुटका यांसह अन्य अवैध धंदे सुरू असल्यास त्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिला आहे. अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्यास त्या विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी कुणाला ही न कळवता तपासणी करण्याचे आदेश ही मंत्री केसरकर यांनी दिले आहेत. पुढील आठवड्यापासून अचानक तपासणी करण्याच्या सूचनाही मंत्री केसरकर यांनी दिल्या आहेत.

ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तरुण व्यसनाधीन झाले आहेत. अनेक महिलांना ही यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. राज्यातील हे अवैध धंदे बंद व्हावेत म्हणून भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. नुकतीच मागील महिन्यात तृप्ती देसाई यांनी भूमाता ब्रिगेडच्या पदाधिका-यांसह मंत्रालयात जाऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या बाबतचे निवेदन ही त्यांना दिले होते. तृप्ती देसाई यांनी अवैध धंदे बंद होण्यासाठी केलेल्या मागणीला आता राज्यसरकारने सकारात्मक प्रतिसाद देत गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ज्या पोलीस अधिका-यांच्या कार्यक्षेत्रात हे अवैध धंदे सुरु आहेत अशा अधिका-यांवरच कारवाई करण्याच्या सूचना पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिका-यांना दिल्या असल्याची माहिती तृप्ती देसाई यांनी बोलताना दिली.

राज्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी घेतली. ग्रामीण भागातील कायदा सुव्यस्था राखण्यासाठी सामाजिक तत्वाला घातक ठरणाऱ्या सर्व प्रकारच्या अवैध धंदे बंद करण्यासाठी सर्व पोलीस महानिरीक्षक यांनी त्या त्या पोलीस ठाण्यांतर्गत अकस्मात भेट देऊन तपासणी करण्यासाठी सूचना दिल्या. अशा प्रकारच्या अवैध धंद्यामुळे उभा राहणाऱ्या अवैध पैशातून गैरकृत्य केले जाते. यामुळे ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येत असून याला आळा घालणे महत्वाचे आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी असे अवैध धंदे सुरू आहे त्या त्या भागातील जनतेने थेट आपल्या कार्यालयात फोन करून किंवा पत्राद्वारे माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून आपण सदर माहितीनुसार कारवाई करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस महासंचालक यांना सांगण्यात येईल असे आवाहन यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या