जालन्यात खाजगी सावकाराच्या घरावर छापा,सहकार विभागाची मोठी कारवाई

सामना ऑनलाईन,जालना

जालना तालुक्यातील वखारी वडगाव येथे खाजगी इसम अवैधरित्या सावकारी करीत असल्याची तक्रार जालना तालुक्याच्या सहायक निबंधकांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात मंगळवारी (दि.२४) सकाळी त्याच्या घरी छापा मारला. या छाप्यात १५ खरेदीखत, ७ कोरे धनादेश व ५ कोरे बॉण्ड ताब्यात घेण्यात आले. या दस्ताऐवजाची चौकशी करण्यात येणार असल्याचे चौकशी अधिकारी सुभाष राठोड यांनी सांगितले.

जालना तालुक्यातील वखारी वडगाव येथील शंकर भुरा जाधव हे अनधिकृत सावकारी करीत असल्याची तक्रार गावातीलच संजय बाबु पवार यांनी जून महिन्यात केली होती. पवार यांच्याकडूनही जाधव यांनी कोरे धनादेश व बॉण्ड घेतलेले होते. या तक्रारीच्या अनुषंगाने सहायक निबंधकांनी सुभाष राठोड यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. श्री. राठोड यांनी चौकशी सुरू केल्यानंतर घराची झडती घ्यावयाची असल्याने मंगळवारी सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास शंकर भुरा जाधव याच्या घरावर छापा मारण्यात आला. या छाप्यामध्ये एकाचवेळी १५ खरेदीखते आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सदरची कार्यवाही विभागीय सहनिबंधक राजेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक जर्नादन गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना तालुक्याचे सहायक निबंधक विष्णु रोडगे, चौकशी अधिकारी सुभाष राठोड, सहकार अधिकारी नारायण पेडवाल, संजय गांजुलवाड यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक बोलोने, पोकॉ.शेख,महिला पोलिस श्रीमती गिरी आदींनी पार पाडली.