सोलापूर जिल्हा परिषदेत सलग दुसऱया दिवशी कारवाई, दोन ग्रामसेवक निलंबित; एकाची वेतनवाढ रोखली

जिल्हा परिषदेत कामचुकार कर्मचाऱयांवर सलग दुसऱया दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कारवाईचा बडगा उगारला असून, दोन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले असून, एका ग्रामसेवकाची वेतनवाढ रोखली आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

रत्नाकर रोहिदास अभिवंत आणि एन. जी. जोडमोरे अशी निलंबित केलेल्या ग्रामसेवकांची नावे आहेत. तर पांडुरंग महादेव एकतपुरे असे वेतनवाढ रोखलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

पांडुरंग एकतपुरे हे माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगाव ग्रामपंचायतीत कार्यरत असताना न्यायालयाची दिशाभूल करणारी माहिती देणे, प्रशासनास सहकार्य न करणे, गैरवर्तन करणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. तर दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील एन. जी. जोडमोरे यांच्यावर बदलीनंतर पदभार हस्तांतरित न करणे, ग्रामपंचायत विकास निधीत अपहार करणे आदी ठपका आहे. माढा तालुक्यातील जाधववाडी येथे कार्यरत असताना रत्नाकर रोहिदास अभिवंत हे गैरहजर राहणे, कामात अनियमितता असे आरोप आहेत. या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. पांडुरंग महादेव एकतपुरे यांच्यावर गैरशिस्तीचे वर्तन करणे आणि प्रशासनात दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांना निलंबित केल्याची घटना ताजी असतानाच ही कारवाई झाल्याने कर्मचाऱयांत खळबळ उडाली आहे.