झवेरी बाजारात बोगस ईडी अधिकाऱ्यांची धाड; सोने व्यापाऱ्याची 25 लाख रोकड आणि तीन किलो सोने जप्त

ईडी अधिकारी असल्याचे भासवून सहा जणांच्या टोळीने झवेरी बाजारातील एका सोने व्यापाऱयाच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या छापा टाकला. अगदी फिल्मीस्टाईलने तेथील कामगारांना दमदाटी व मारहाण करून 25 लाखांची रोकड, तीन किलो सोने जप्त करून नेले. छापेमारी करून सर्व सटकले, पण 24 तासांच्या आतच आरोपींच्या हातात बेडय़ा पडल्या.

सोमवारी दुपारच्या वेळेस झवेरी बाजारात नेहमीप्रमाणे दैनदिन कारभार सुरू असताना व्ही.बी. बुलियन या सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय करणाऱया व्यापाऱयाच्या कार्यालयावर छापा पडला. दोन वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्ती कार्यालयात घुसले व त्यातील एकाने माळी नावाच्या कर्मचाऱयाच्या कानशिलात वाजवून दहशत निर्माण केली. त्यावर माळी यांनी तुम्ही कोण असे विचारल्यावर आम्ही ईडी कार्यालयातून आल्याचे सांगूत मालक विराटभाई कुठेय अशी विचारणा करत माळी व अन्य कामगारांचे मोबाईल आपल्या ताब्यात घेतले. मग तुमच्या कार्यालयावर ईडीची धाड पडली असल्याचे सांगून आरोपींनी कपाटातील 25 लाखांची रोकड ठेवलेल्या तीन बँग, माळी याच्या खिशातील अडीच किलो सोने तसेच कार्यालयाच्या काउंटरमध्ये असलेले 500 ग्रॅम सोने ताब्यात घेतले. त्या वेळी कामगारांनी ओळखपत्र व कागदपत्रांची मागणी केल्यावर तुम्हाला ठार मारू असे धमकावत त्यांना हाथकडी दाखवली. त्यानंतर माळीला हातकडी लावून आरोपी ऐवज व मोबाईल घेऊन कार्यालयाबाहेर पडले. तेथून ते विराटभाई यांचे जुने कार्यालय असलेल्या धनजी स्ट्रिट येथील डायमंड हाऊसमध्ये गेले. त्या कार्यालयात भामटय़ाचे दुसरे पथक आधीच व्यवस्थापक विजयभाई शहा यांना ताब्यात घेऊन बसले होते. इतपर्यंत छापेमारीचे यशस्वी नाटक केल्यानंतर त्या कामगारांना सोडून देऊन आरोपी मुद्देमालासह एका गाडीतून पसार झाले.

24 तासांत बनावट ईडी कारवाईचा पर्दाफाश

बनावट ईडी छापेमारीची परिसरात बोंबाबोंब झाल्यानंतर हा प्रकार लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांना समजला. एसीपी ज्योत्स्ना रासम, वरिष्ठ निरीक्षक ज्योती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राहुल भंडारे, सुशीलकुमार वंजारी, बनकर, डिगे, दराडे व पथकाने तत्काळ तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच खबऱयांच्या मदतीने शोध घेऊन पोलिसांनी फजल गिलीटवाला, रजी अहमद रफीक या दोघंना मुंबईत तर विशाखा मुधोळे या महिलेला खेडमध्ये पकडले. या आरोपींकडून 15 लाखांची रोकड व अडीच किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे. अन्य तिघा आरोपींचा शोध सुरू असल्याचे उपायुक्त अभिनव देशमुख यांनी सांगितले.

ईडी म्हणजे काय माहिती नाही

ईडीचा अर्थ काय, त्यांचे नेमके काम काय हेच आरोपींना ठाऊक नाही. सध्या ईडी कारवायांची सर्वत्र चर्चा असल्याने आम्ही ईडी अधिकारी बनून ही छापेमारी केल्याचे आरोपी सांगत असल्याचे समजते.