जादा विद्यार्थी दाखवून शालेय पोषण आहाराची रक्कम उचलणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई

235

नांदेडमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी 2011-12 यावर्षी केलेल्या शिक्षण संस्थांच्या पटपडताळणी दरम्यान झालेल्या चौकशीनंतर जादा विद्यार्थी दाखवून शालेय पोषण आहार उचलल्याचा मुद्दा समोर आला होता. फुगवलेल्या या आकड्यावर आक्षेप घेतल्यानंतर शालेय पोषण आहाराची रक्कम उचलणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई सुरु झाली असून, शिक्षण विभागाने आजपर्यंत 30 लाख रुपयांची वसुली याबाबत संबंधिताकडून वसूल केल्याचे समोर आले आहे.

2011-12 या वर्षी झालेल्या पटपडताळणी दरम्यान जिल्हयातील अनेक संस्था चालकांचे पितळ उघडे पडले होते. पटपडताळणी दरम्यान अनेक शाळांनी जादा विद्यार्थी दाखवून शालेय पोषण आहार उचलल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर संबंधीत शाळांकडून याबाबतची वसुली करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वसुली चालू केली असल्याची माहिती समोर येत असून आजपर्यंत जवळपास ३० लाखाची वसुली झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकर परदेशी यांनी आपल्या कल्पकतेतून सन 2011-12 या काळात जिल्हयातील शाळांतील विद्यार्थ्यांची एकाच दिवशी पटपडताळणी केली होती. या पटपडताळणीच्या माध्यमातून जिल्हयातील शाळांनी व संस्थाचालकांनी दाखवलेल्या बोगस विद्यार्थी व उपस्थित विद्यार्थी यांच्यात मोठी तफावत आढळून आली होती. यानंतर पटपडताळणी नांदेड पॅर्टननुसार राज्यात एकाच दिवशी पटपडताळणी करण्यात आली होती. पटपडताळणी दरम्यान जिल्हयातील 137 शाळा दोषी आढळल्या होत्या. यात संबंधीत शाळांनी अधिकचे विद्यार्थी दाखवत शालेय पोषण आहार व शासनाकडून मिळणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती असलेल्या सुविधांचा लाभ घेतल्याचे उघड झाले होते. त्यानंतर शासनाने तत्कालीन कामगार मंत्री नामदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत राज समिती पाठवली होती. या दरम्यान पंचायत राज समितीने याबाबत हा मुद्दा फोकस करत या बाबतची माहिती घेतली होती व शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित शाळांकडून अतिरिक्त शालेय पोषण आहार उचललेल्या शाळांकडून वसूली करण्याचे आदेश दिल्यानंतर संस्थाचालकासह मुख्याध्यापकांचे धाबे दणाणले होते.

या निर्णयाच्या विरोधात काही संस्थाचालकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. तेथेही त्यांच्या पदरी निराशाच आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हयातील शाळांकडून अतिरीक्त शालेय पोषण आहार उचललेल्या शाळांची थकबाकी काढत त्यांना रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिक्षण संस्थांनी रक्कम भरण्यास सुरुवात केली असून आजपर्यंत जवळपास ३० लाख रुपयांच्या वसुलीचा भरणा शिक्षण विभागाच्या लेखाशिर्ष असलेल्या 0202 संकेतांक क्रमांकावर जमा झाला असल्याचे सांगण्यात आले.

शिक्षण विभागाने वसुलीसाठीची नोटीस दिलेल्या देगलुर, नायंगाव, कंधार,  बिलोली, मुखेड या तालुक्यातील संस्थांनी ३० लाखाची वसुली शिक्षण विभागाकडे भरली असल्याची माहिती समोर येत असून केवळ नांदेड तालुका या बाबतीत मागे असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या