मालवणात सहा लाखांचा दंड वसूल; विनामास्क फिरणाऱ्या सुमारे 3 हजार जणांवर कारवाई

कोरोना कालावधीत गेल्या 11 महिन्यात मालवण नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या 3 हजारपेक्षा जास्त व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून सहा लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.

नगरपालिका कर्मचारी व पोलीस प्रशासन व होमगार्ड पथक यांच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्या पर्यटक व नागरिकांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला. यात एप्रिल (2020) महिन्यात 44 व्यक्तींवर कारवाई करून 30 हजार 300 रुपये दंड, मे महिन्यात 175 व्यक्तींकडून 64 हजार 100 रुपये दंड, जूनमध्ये 95 व्यक्तींकडून 32 हजार दंड, जुलैमध्ये 88 व्यक्तींकडून 17 हजार 600 रुपये दंड, ऑगस्टमध्ये 177 व्यक्तींकडून 56 हजार 700 रुपये दंड, सप्टेंबरमध्ये 80 व्यक्तींकडून 15 हजार 600 दंड, ऑक्टोबरमध्ये 274 व्यक्तींकडून 38 हजार 600 रुपये दंड, नोव्हेंबरमध्ये 426 व्यक्तींकडून 52 हजाराचा दंड, डिसेंबरमध्ये 356 व्यक्तींकडून 56 हजाराचा दंड, जानेवारीमध्ये 860 व्यक्तींकडून 1 लाख 40 हजार 400 रुपयांचा दंड, फेब्रुवारीमध्ये 296 व्यक्तींकडून 57 हजाराचा दंड, तर मार्च महिन्यात आतापर्यंत 5 हजारपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने स्वतंत्रपणे फेब्रुवारी महिन्यात 199 व्यक्तींवर विनामास्क फिरल्याप्रकरणी 40 हजार दंड वसूल केला.

मालवण नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात फलक लावत तसेच रिक्षा स्पीकरद्वारे वारंवार जनजागृती केली जात आहे. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या वतीनेही मास्क वापराबाबत सातत्याने आवाहन केले जात आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढल्याने मास्क न वापरणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

जानेवारी महिन्यात सर्वाधिक दंड वसूल
जानेवारी महिन्यात मालवण शहरात सर्वाधिक दंडात्मक कारवाई करण्यात आली. विनामास्क फिरणाऱ्या 860 पर्यटक व नागरीकांकडून तब्बल 1 लाख 40 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशी माहिती पालिका प्राशसनाने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या