अमरावतीमध्येही मापात पाप, ठाणे क्राईम ब्रँचने केली पेट्रोल पंपावर कारवाई

38

सामना ऑनलाईन, अमरावती

पेट्रोल भरण्यासाठीच्या यंत्रामध्ये एक चीप बसवून त्याद्वारे पेट्रोल चोरी करणाऱ्या गँगचा ठाणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी उलगडा केला होता. या चीपमुळे राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या हक्काचं पेट्रोल किंवा डिझेल पूर्ण पैसे भरूनही त्यांना मिळत नव्हतं. अशा पेट्रोल पंपांवर ठाण्याच्या गुन्हे शाखेने राज्यव्यापी कारवाई सुरू केली आहे. अमरावतीमध्ये या कारवाईअंतर्गत हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पद्मिनी पेट्रोल पंपावर धाड टाकण्यात आली.

या पेट्रोलपंपावर डिस्पेन्सर मशिनमध्ये पल्सर नावाची चीप बसवली होती. या चीपमुळे ग्राहकाला इंधनाचा इच्छित आकडा मशिनवर पूर्ण दिसायचा,  मात्र प्रत्यक्षात ग्राहकाला कमी इंधन मिळायचं. या चीपद्वारे पाच लीटर पेट्रोलमागे तब्बल १०० मिली आणि पाच लीटर डिझेलमागे ११० मिलीची चोरी करण्यात येत होती. मागील अनेक वर्षांपासून ग्राहकांची ही फसवणूक सुरू होती. विजय जाधव नावाच्या व्यक्तीकडे या पेट्रोलपंपाचा परवाना आहे. मात्र मागील काही वर्षांपासून हा पेट्रोलपंप जाधव यांनी वैभव राऊत नावाच्या व्यक्तीला ‘लीज’वर चालवण्यासाठी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या