संचारबंदी कालावधीत अनावश्यक फिरणाऱ्यांवर मालवण भरड नाका पोलिसांची कारवाई

मालवण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. पोलीस प्रशासनाकडूनही नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे. रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बाजारपेठ मार्गावर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाई दरम्यान अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणाऱ्या दोन व्यक्तींच्या दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या.

पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांनी ही कारवाई केली. पोलीस, होमगार्ड व नगरपालिका पथक या कारवाईत सहभागी झाले होते. ताब्यात घेतलेल्या गाड्या पोलीस ठाण्यात नेण्यात आल्या असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या