
आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कॉमेडियन बिरबल यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांचा जवळचा मित्र, सहकलाकार जुनगू यांनी ही माहिती दिली. ‘शोले’ या चित्रपटात त्यांनी अर्धी मिशी असलेल्या पैद्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका त्यावेळी चांगलीच गाजली.
पंजाबमधील गुरुदासपूर येथे जन्मलेल्या बिरबल यांचे खरे नाव सतिंदर कुमार खोसला, परंतु त्यांचे नाव नॉन फिल्मी वाटत असल्याने अनिता या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेते मनोज कुमार आणि दिग्दर्शक राज खोसला यांनी त्यांचे नामकरण बिरबल असे केले. बिरबल यांनी 1967 साली मनोज कुमार यांच्या ‘उपकार’ या चित्रपटातून डेब्यू केला. पुढे त्यांनी मनोज कुमार यांच्यासोबत ‘शिर्डी के साईबाबा’, ‘रोटी कपडा और मकान’ आणि ‘क्रांती’ या चित्रपटात काम केले होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी हिंदी, मराठी, पंजाबी आणि भोजपुरी भाषेतील 500 हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या.