रंगभूमीवरचा प्रत्येक माणूस माझा!

> शब्दांकन : राज चिंचणकर

नाटय़सृष्टीतला प्रवास आणि त्यात भेटलेल्या व्यक्तींविषयी सांगत आहेत अभिनेते व दिग्दर्शक प्रमोद पवार.
नाटक हे माझ्या आयुष्याचा अविभाज्य अंग कधी झाले ते खरे तर मला कळलेच नाही. वास्तविक, चित्रकार होण्याचे माझे स्वप्न होते; पण ते पूर्ण होऊ शकले नाही. माझ्यातल्या कलाकाराला खऱ्या अर्थाने वाट मिळाली, ती एकांकिकांच्या माध्यमातून! प्रत्येक वळणावर आपल्याला कुणीतरी गुरू मिळावा लागतो आणि तो मला मिळत गेला. आयुष्यात तुम्हाला योग्य दिशा देणारी माणसे मिळणे आवश्यक असते. माझ्या आयुष्यात ‘उदय कला केंद्र’ ही संस्था आली. तसेच रुपारेल कॉलेज, एम.डी. कॉलेज आले आणि या सगळ्या वाटचालीतून हळूहळू शिकत आज मी जो कुणी आहे, तो बनलो आहे.

मी स्वतःला फार मोठा समजत नाही, मला त्याची गरज वाटत नाही. कारण एक ‘कार्यकर्ता’ या स्वरूपात मी सतत काम करतो. पण 1982 मध्ये ‘टिळक आणि आगरकर’ हे नाटक माझ्या वाटय़ाला आले आणि पूर्णपणे दिशा बदलून गेली. या क्षेत्रात मुख्य भूमिकेसाठी मला जो प्रयत्न करावा लागणार होता; तो आपोआपच तिथे संपला होता. त्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये ‘टिळक स्मारक’मध्ये आमच्या या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांना प्रत्यक्ष पाहिलेले लोक या प्रयोगाला आले होते. तुडुंब गर्दी होती. पहिल्या रांगेमध्ये तर ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, पु. ल. देशपांडे यांच्यासारखी दिग्गज मंडळी होती. या सगळ्यांच्या समोर पहिला प्रयोग करताना ‘थरथरणे’ म्हणजे काय, याची अनुभूती मला आली. नाटक तीन अंकी होते आणि दुसऱ्या अंकानंतर ही सगळी मंडळी रंगमंचावर आली. आम्ही त्यांच्या पाया पडायला वाकलो तर ते म्हणाले, ‘आज तुम्ही वाकायचे नाही. आज तुम्ही आमच्यासमोर आमच्या जवळचा इतिहास जिवंत करत आहात आणि आम्ही तुम्हाला त्यांच्या रूपातच पाहत आहोत. आता तुम्ही ‘ते ‘आहात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासमोर वाकणार,’ असे म्हणत त्या मंडळींनी, आपण रंगभूमीला जसा नमस्कार करतो तसा सगळ्यांना मिळून नमस्कार केला.

या नाटकामुळेच मला पुढे वेगवेगळ्या भूमिका मिळाल्या. ‘चंद्रलेखा’ नाटय़संस्थेत मी त्यापूर्वीच होतो, पण तिथे मोहन वाघ यांच्याशी एका भूमिकेवरून छोटसे भांडण झाले. वास्तविक त्यांनी मला सांगितले होते की, ‘आता तू आमच्या संस्थेत दाखल झाला आहेस. नोकरी सोड, माझ्याकडे रहा.’ पण मला ते शक्य नव्हते. त्याच त्याच प्रकारच्या भूमिका मी करत राहिलो असतो, असे मला वाटल्याने मी ते केले नाही. पण त्यांच्याकडे काम करताना असा पहिला माणूस मी होतो, की ज्याला दुसऱ्या संस्थेत जाऊन काम करायला त्यांनी परवानगी दिली. साहित्य संघाचे विश्राम बेडेकर लिखित व दिग्दर्शित ‘टिळक आणि आगरकर’ हे ते नाटक होते.

दोन वर्षांनंतर मोहन वाघ यांच्याबरोबर खटका उडाला आणि त्यानंतर पुढची 14 वर्षे मी ‘चंद्रलेखा’मध्ये काही केले नाही, पण नंतर मला त्यांचा एकदा अचानक फोन आला. ‘लगेच मला भेटायला ये. नाटक करतोय. त्यात तुला काम करायचे आहे,’ असे ते म्हणाले. त्यांचे एक होते, वाजले की एकदम टोकाचे; नाहीतर प्रेम म्हणजे अगदी इतके की बाप रे बाप! त्यांच्याकडे ‘झुंज’ हे नाटक करताना मी प्रचंड आजारी होतो आणि मला प्रयोग करावा लागणारच होता. तेव्हा ते मला
टॅक्सीने डॉक्टरकडे घेऊन गेले. माझी नीट व्यवस्था केली. माझ्यावर खर्च करून त्यांनी मला त्या वेळी खूप सांभाळले.

मोहन वाघ यांच्या जाण्यानंतर मी जो एक लेख लिहिला होता, त्याचे शीर्षक होते ‘ताठ कण्याचा माणूस.’ कुणापुढे ते कधी वाकले नाहीत. नाटकावर अत्यंत प्रेम करून, स्वतःच्या नेपथ्यावर प्रेम करणारा, त्याबद्दल इतका जिव्हाळा असलेला माणूस मी पाहिलेला नाही. त्यांच्या कलंदरपणाला किंवा त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यासाठी मी आजही नतमस्तक होतो. आमच्यात भांडण झाले होते, तरी त्यांनी शेवटी ज्या पद्धतीने मला जवळ केले होते, ते मी विसरू शकत नाही. माझ्या आयुष्यात जी काही महत्त्वाची माणसे आली, त्यात मोहन वाघ हे व्यक्तिमत्त्व होते.

पुढे राजदत्त यांच्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. चित्रपटाचे वेगळे माध्यम त्यांच्याकडून मला समजून घेता आले. मी केलेली ‘मर्मबंध’ नावाची दूरदर्शन मालिकाही त्यांनी दिग्दर्शित केली. त्यांचा एक वेगळा आयाम मला बघायला मिळाला. अशी माणसे आयुष्यात मिळत जातात आणि तशी ती मिळावी लागतात. मग तुमचे प्रेम नाटकावरचे असेल, सिनेमावरचे असेल किंवा माणसांवरचे असेल; ते खऱ्या अर्थाने टिकून राहते. मला रंगभूमीवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस माझा वाटतो. ही सगळी मंडळी माझ्या आयुष्यात येऊन गेली आणि त्यांनी खूप वेगळे संस्कार माझ्यावर घडवले. त्या संस्कारांचा मी ऋणी आहे.