लोखंडी मुठेने अभिनेत्री कृतिकाला ठार केले

18

सामना प्रतिनिधी । मुंबई

मॉडेल आणि अभिनेत्री कृतिका चौधरी हिची हत्या झाल्याचे पोस्टमॉर्टेम अहवालातून स्पष्ट झाले आहे. चार बोटांमध्ये लोखंडी मूठ घालून त्यानेच ठोसे मारून कृतिकाला ठार मारल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मारेकऱयाचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे तसेच क्राइम ब्रँचची पथके तयार करण्यात आली आहेत.

‘सावधान इंडिया’ या रिऑलिटी शोबरोबरच रज्जो चित्रपट तसेच इतर छोटय़ा भूमिका करणाऱया कृतिका चौधरी हिचा मृतदेह चार बंगला येथील तिच्या घरात सापडला. भैरवनाथ सोसायटीमध्ये कृतिका राहत होती. तिच्या घराला बाहेरून कडी लावलेली होती. त्यातच दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिकांनी पोलिसांना कळविले. मृत्यूचे नेमके कारण समजत नसल्याने पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला.पोस्टमॉर्टेम अहवालात मारहाणीच्या खुणा आल्यानंतर आंबोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. कृतिका हिच्या मानेवर, डोक्यावर तसेच अन्य ठिकाणी मारहाण झाल्याच्या खुणा आहेत. लोखंडी मूठ वापरून तिला मारहाण केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

कॉण्टॅक्ट आणि सोशल मीडियाची झाडाझडती

कृतिका हिची कॉण्टक्ट लिस्ट आणि फेसबुक, व्हॉटसऍप चॅटवरील मित्रमंडळींची पोलिसांनी झाडाझडती सुरू केली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी कृतिकाला मारल्याचा अंदाज असल्याने तिला भेटण्यासाठी कोण आले होते याची माहिती शेजाऱयांकडून घेतली जात आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फूटेज देखील तपासण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या