‘सोन्यात जीव रंगला’, अभिनेते मिलिंद दास्ताने यांना पत्नीसह अटक

सामना प्रतिनिधी । पुणे

औंध येथील पीएनजी ब्रदर्स या सराफी पेढीतून सोने खरेदी करून बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करून तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील अभिनेते मिलिंद दास्ताने व त्यांच्या पत्नीला चतुशृंगी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना 21 जूनपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.

अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने, त्याची पत्नी सायली (रा. धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत ‘पीएनजी ब्रदर्स’च्या अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ यांनी फिर्याद दिली आहे. दास्ताने यांनी औंध येथील आयटीआय रस्त्यावरील ‘पीएनजी ब्रदर्स’ सराफी पेढीमधील कर्मचाऱयाशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तेथून वारंवार सोने-चांदीचे दागिने, बिस्कीटे व हिरे खरेदी केले होते. त्यानंतर दास्ताने याने खरेदी केलेल्या दागिन्यांची काही प्रमाणात रक्कम दिली होती. मात्र उर्वरीत रक्कम व त्यावरील व्याज देण्यास दास्ताने हा वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करीत होता. वारंवार मागणी करुनही दास्ताने याने बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करत 25 लाख रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या