आम्ही खवय्ये: खाण्यावर मनापासून प्रेम

590

अभिनेत्री मुग्धा गोडबोले…खाण्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं खूप कमी असतात. पण या प्रेमामुळेच मुग्धा प्रत्येक पदार्थांचा आस्वाद छानपैकी घेऊन खात असते.

  • ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – माझ्यासाठी खाणं म्हणजे ‘आनंद’.
  • खायला काय आवडतं? – साधं, कमी मसाले घालून केलेल्या घरगुती भाज्या, पुरणपोळी, घरचे खव्याचे गुलाबजाम अतिशय आवडतात. बाहेरचे गुलाबजाम आवडत नाहीत. घरी पुदिन्याची चटणी करून केलेली भेळ, पट्टीचे सामोसे अत्यंत आवडते. त्यानंतर मांसाहार करू लागले तेव्हा खिमा पाव या प्रकारावर मी जगू शकते.
  • खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – रात्री फार उशिरा जेवत नाही. सकाळी लवकर उठते. खाण्याच्या वेळा पाळल्या जातात. जेवणाचा डबा सोबत असतोच.
  • डाएट करता का? – दर तीन-चार तासांनी खाते. संध्याकाळी जे खाते त्यानंतर काही खात नाही. गेली कित्येक वर्ष दोन पोळ्यांपेक्षा जास्त पोळी घेतलेली नाही. बेकरी प्रोडक्टस् टाळते.
  • प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – अशा वेळी डाएट सांभाळायला फार चॉइस नसतो. पण खूप व्यस्त दिनक्रम असेल तर अशा वेळी वेळच्या वेळी जे असेल ते खाते. सुकामेवा, फळे शक्य असेल तर सोबत ठेवते.
  • जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा काय खाऊ घालता? – खिमा पाव, पाठारे प्रभू रेसिपी करते.

चिज केक

120 ग्रॅम्स मारी बिस्किटांचा चुरा करावा. (म्हणजे साधारण सव्वा पाकिट). त्यात बटर घालून ते मिक्स करावं. एका जाड बुडाच्या किंवा काचेच्या पातेल्याला खाली थोडं बटर लावून त्यावर तो चुरा पसरावा. हाताने दाबून सारखा करावा. मिक्सरच्या भांडय़ात पनीर, मिल्कमेड, स्ट्रॉबेरी क्रश, क्रीम चीज एकेक करत घालत जावं. सगळं एकत्र करून घ्यावं. जिलेटिन साधारण दीड ते दोन चमचे पाण्यात ढवळून घ्यावं. तयार मिश्रण दुसऱ्या भांडय़ात काढून त्यात जिलेटिनचं पाणी घालावं. हलक्या हातानं एकत्र करून तयार मिश्रण बिस्किटांच्या चुऱ्यावर पसरावं. झाकण ठेवून हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवावं. हे बेक करण्याची गरज नाही. 3-4 तासांनंतर बाहेर काढून त्यावर ताज्या स्ट्रॉबेरीज्चे काप पसरावे. आणि थंड असतानाच खाण्यास द्यावे. लेमन चीज केक करायचा असल्यास मिश्रणात स्ट्रॉबेरी क्रशऐवजी 2 ते तीन लिंबांचा रस घालावा.

आपली प्रतिक्रिया द्या