ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन

सामना प्रतिनिधी। मुंबई

भारदस्त आवाज आणि ताकदीचा अभिनय यांच्या जोरावर समांतर आणि व्यावसायिक चित्रपटसृष्टीतील हुकमी अभिनेता ठरलेल्या ओम पुरी यांचे आज हृदयविकाराच्या तीक्र झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. ‘घाशीराम कोतवाल’ या मराठी चित्रपटात घाशीरामची भूमिका साकारून कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या या अष्टपैलू अभिनेत्याच्या निधनाने सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.

ओम पुरी यांची प्राणज्योत शुक्रवारी सकाळी वर्सोवा येथील त्रिशूल निवासस्थानी मालवली. त्यानंतर त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आले. गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री विद्या बालन, शबाना आझमी, दिग्दर्शक प्रकाश झा, गोविंद निहलानी, श्याम बेनेगल, रझा मुराद या मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी ओशिवरा येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुरी यांच्या पश्चात मुलगा इशान आहे.

ओम पुरी यांनी १९७६ साली ‘घाशीराम कोतवाल’ या मराठी चित्रपटातून मोठय़ा पडद्यावर पर्दापण केले. ‘आक्रोश’ हा त्यांचा पहिला गाजलेला चित्रपट. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ‘आक्रोश’मधील भिकू, ‘अर्धसत्य’ मधील अनंत वेलणकर, ‘घायल’मधील एसीपी जॉय डिसोझा, ‘नरसिंह’मधील सूरज नारायण सिंह बापजी, ‘माचिस’मधील सनातन, ‘चाची ४२०’मध्ये बनवारीलाल, ‘हेराफेरी’मधील खडकसिंग, ‘रंग दे बसंती’ मधील अमानुल्ला खान, ‘दबंग’मधील पोलीस इन्स्पेक्टर, ‘जाने भी दो यारों’ मधील बिल्डर आहुजा अशा गंभीर आणि विनोदी भूमिका त्यांनी अजरामर केल्या. १९९० साली त्यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले.

 

आपली प्रतिक्रिया द्या