मालिकेच्या सेटवरून अभिनेत्याची हकालपट्टी

21

सामना ऑनलाईन । मुंबई

मालिकेतल्या कलाकारांचे नखरे, आदळआपट ही तशी काही नवीन बाब नाही. विशेषतः मालिकेतील अभिनेत्रींच्या बाबतीत असे किस्से ऐकायला मिळतात. पण, पहिल्यांदाच अशा प्रकारच्या वागणुकीसाठी एका पुरुष कलाकाराला मालिकेच्या सेटवरून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दिल से दिल तक या मालिकेतील मुख्य अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याला त्याच्या वर्तणुकीसाठी मालिकेच्या सेटवरून हाकलण्यात आलं आहे.

बालिका वधू, झलक दिखला जा, बिग बॉस, खतरोंके खिलाडी अशा अनेक टीव्ही शोंमधून झळकलेल्या अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याला मालिकेच्या निर्मात्यांनी सेटबाहेर हाकलून लावलं असून पुन्हा सेटवर कधीही पाऊल ठेवू नकोस, असं बजावण्यात आलं. दिल से दिल तक या मालिकेच्या सेटवर हा सगळा प्रकार घडला. वेळेवर सेटवर न येणं, उद्धटपणा तसंच शिवीगाळ करणं, मन मानेल तसं वागणं यांमुळे मालिकेची संपूर्ण टीम सिद्धार्थवर प्रचंड वैतागली होती. वारंवार समजावूनही सिद्धार्थवर काहीच परिणाम होत नव्हता. त्यामुळे टीमने चॅनलच्या प्रोजेक्ट हेडकडे सिद्धार्थविरुद्ध तक्रार केली होती.

सूत्रांनुसार, गुरुवारी संध्याकाळी सिद्धार्थ जेव्हा सेटवर पोहोचला तेव्हा प्रोजेक्ट हेड शीतल तिथे उपस्थित होत्या. शीतल यांनी सिद्धार्थविरुद्ध आलेल्या तक्रारींबद्दल त्याला विचारणा केली. मात्र, या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी सिद्धार्थने तिथेच सर्वांसमोर आरडाओरडा आणि शिवीगाळ सुरू केली. शीतल यांनी सुरुवातीला सिद्धार्थला समजवण्याचा प्रयत्न केला. पण, सिद्धार्थ काही केल्या थांबत नाही असं पाहून त्यांनी तात्काळ सिद्धार्थला सेट सोडून जायला सांगितलं आणि पुन्हा सेटवर पाऊल ठेवू नकोस, असंही बजावलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या