कॉमेडीचे अचूक टायमिंग आणि चतुरस्र अभिनयाने मराठी प्रेक्षकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम (67) यांचे शनिवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. गेल्या दीड वर्षापासून ते कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी पद्मश्री आणि मुलगा गंधार असा परिवार आहे. विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून सहकलाकारांना मदत करणारा जिगरी दोस्त गमावला, अशा भावना कलाकारांनी व्यक्त केल्या.
दीड वर्षापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर चार किमोथेरेपी आणि दोन सर्जरी करण्यात आल्या होत्या. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आजारपणात पत्नी व मुलाने आपल्याला खंबीर साथ दिली, असे विजय कदम यांनी सांगितले होते. आजारातून हळूहळू सावरत असताना त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. अखेर आज त्यांनी जगाचा निरोप घेतला.
चित्रपट, मालिकाही गाजवल्या
‘टुरटुर’मधील भूमिका पाहून विजय कदम यांना चित्रपटांसाठी विचारणा होऊ लागली. ‘राजानं वाजवला बाजा’, ‘हळद रुसली पुंकू हसलं’, ‘आनंदी आनंद’, ‘इरसाल कार्टी’, ‘लावू का लाथ’, ‘गोळाबेरीज’, ‘वासुदेव बळवंत फडके’, ‘रेवती’, ‘देखणी बायको नाम्याची’, ‘मेनका उर्वशी’, ‘चष्मेबहाद्दर’, ‘आम्ही दोघं राजा राणी’, ‘कोकणस्थ’ आदी चित्रपटांत त्यांनी अभिनयाची छाप उमटवली. ‘पार्टनर’, ‘गोटय़ा’, ‘दामिनी’, ‘सोंगाडय़ा’, ‘बाज्या’, ‘इंद्रधनुष्य’, ‘घडलंय बिघडलंय’, ‘ती परत आलीय’ अशा मराठी मालिकांसह ‘श्रीमान श्रीमती’, ‘मिसेस माधुरी दीक्षित’, ‘अफलातून’, ‘घर एक मंदिर’, ‘जिंदगी नॉट आऊट’ या हिंदी मालिकेत त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
बालरंगभूमीपासून अभिनयाची सुरुवात
विजय कदम यांनी ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बालनाटकात शिपायाची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केले. कलावंत म्हणून त्यांची जडणघडण डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये झाली. दरवर्षी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते हिरिरीने भाग घ्यायचे. पुढे त्यांनी रुपारेलमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत काम करताना व्यावसायिक दिग्दर्शकांसमवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. ‘स्वप्न गाणे संपले’ या नाटकात सतीश दुभाषी, जयराम हर्डीकर, शिवाजी साटम अशा प्रतिथयश कलावंतांसोबत त्यांनी काम केले. ‘खंडोबाचं लगीन’ नाटकात साकारलेल्या ‘हेगडी प्रधान’च्या भूमिकेसाठी त्यांना नाटय़दर्पणचा ‘सर्वोत्कृष्ट लोकनाटय़ अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला.
‘विच्छा माझी पुरी करा’ने दिली लोकप्रियता
‘अपराध कुणी केला’ या नाटकात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक. पुढे ‘रथचक्र’, ‘असावे घरटे आपले छान’, ‘सख्खे शेजारी’, ‘हलकंफुलकं’ ही त्यांची व्यावसायिक नाटके गाजली. ‘टुरटुर’ने तर अक्षरशः रंगभूमीवर धुमाकूळ घातला. राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणाऱ्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ाने त्यांना अमाप लोकप्रियता मिळून दिली. 1986 पासून या वगनाटय़ाचे त्यांनी 750 हून जास्त प्रयोग केले होते. आपल्या ‘विजयश्री’ या संस्थेतर्फे ‘खुमखुमी’ हा एकपात्री कार्यक्रम ते सादर करत. या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना मदत केली होती. लॉकडाऊनमध्ये यूटय़ूबवर त्यांनी ‘कदमखोल’ ही नवीन मालिका सुरू केली होती.
त्यांना बघत बघत आम्ही शिकलो
1983 मध्ये मी पहिल्यांदा ‘टुरटुर’ नाटकात काम केले त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांची जोडी सुपरहिट होती. त्यांना बघत बघत आम्ही शिकत होतो. विजय कदम खूपच भारी होता. त्याची भाषाशैली, रिअॅक्शनची स्टाइल छान होती, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केल्या.
सच्चा दोस्त गमावला
माझा खूप जवळचा मित्र आज हरपला. उत्कृष्ठ नट तर तो होताच, त्यासोबत चांगल गाण, वादनं, लिखाण तो करायचा. त्याच्याकडून मला खूप शिकायला मिळाले. मराठी इंडस्ट्री आज एका चांगल्या नटाला मुकली आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी दिली.
मनाला चटका लावणारी एक्झिट
‘हलकफुलकं’ या नाटकात आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केले होते. पुढे ‘चष्मेबहाद्दर’, ‘लावू का लाथ’ अशा अनेक चित्रपटांत काम केले. माझ्या सिनेमात त्याचा हमखास रोल असायचा. त्याच्याशिवाय माझे पान हलत नव्हते, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केली.