सात्त्विक आणि संतुलित

1062

ज्येष्ठ कलावंत विजय पाटकर जेवणा-खाण्यासाठी अत्यंत अनिश्चित अशा कला क्षेत्रात राहूनही सात्त्विक आणि संतुलित आहारावर कटाक्षाने भर आहेत.

खाणं या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – खाणं म्हणजे आनंद, तृप्तता.

खायला काय आवडतं? – मी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही असलो तरी मला शाकाहार जास्त आवडतो. यामध्ये बटाट्याची भाजी, डाळिंबीची उसळ हे माझे दोन विक पाईंट आहेत. गोड पदार्थांत पुरळपोळी आवडते.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – फिटनेसची काळजी मुळीच घेत नाही. पण मी कधी अतिप्रमाणात खात नाही. आवडलंय म्हणून खूप खाऊया असं कधी करत नाही.

डाएट करता का?-मुळीच नाही. डाएटचा आणि माझा काही संबंध नाही.

दौर्‍यादरम्यान बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – वरण-भात तर कुठेही मिळते. शिवाय एक पोळी आणि एखादी भाजी. एवढं मिळालं की मला खूप होतं. माझं जेवणंही फारसं नाहीए. प्रयोगानंतरच खातो. मला प्रयोगाच्या आधी खाऊन जमतच नाही. थोडंस हलकं म्हणजे एखादं सँडविच वगैरे एवढंच खातो. कितीही उशिरा प्रयोग संपला तरी त्यानंतरच जेवतो.

दौर्‍यानिमित्त आवडलेला खास पदार्थ? – सोलापूरची शेंगदाणा चटणी, पांढरा रस्सा, नगरला मिळणारी उकड म्हणजे मटणाचा रस्सा, कोकणात गेलो मालवणला की, मला मासे आवडतात. असे त्या त्या ठिकाणचे पदार्थ मला खायला खूप आवडतात.

आठवड्यातून किती वेळा बाहेर खाता? – हॉटेलमध्ये जाऊन खायला मला आवडत नाही. भल्या भल्या पार्टीत न जेवता मी घरी येऊन जेवलोय.

कोणत्या हॉटेलमध्ये जायला आवडतं? – अंधेरीत कोर्टयार्ड हॅटेल आहे. तिथे मला जायला आवडतं.

घरी केलेल्या स्वयंपाकात काय आवडतं? – शाकाहारासोबतच माशांमध्ये कोलंबी, पापलेट, बोंबिल हे माझ्या आवडीचे आहेत.

स्ट्रिट फूड आवडतं का? – नाही आवडतं. पूर्वी खूप खाल्लयं, पण गेल्या दहा ते पंधरा वर्षांत खाल्लं नाहीए. अगदीच खाण्याची वेळ आली तर मला वडापाव खायला आवडतो.

घरी आलेल्या पाहुण्यांना काय खाऊ घालता? – शक्यतो मासे करतो. माझी पत्नी सुगरण आहे. त्यामुळे मासे खाऊ घालायला आवडतात. पाहुण्यांच्या आवडीप्रमाणे शाकाहारी पदार्थही असतात. तिचे काही खास पदार्थ आहेत. त्यामध्ये भरलेलं पापलेट ती अप्रतिम करते.

आपली प्रतिक्रिया द्या