सुंदराची रंगभूमीवर एंट्री

अभिनेत्री अक्षया नाईकने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून छोटय़ा पडद्यावर पदार्पण केले. आता अक्षया रंगभूमीवर एंट्री करण्यास सज्ज झाली असून ती या नाटकात मुख्य भूमिका साकारणार आहे. नाटकाचे नाव आणि तिची नेमकी काय भूमिका असेल हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

 अक्षयाने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये ती एका वयस्कर महिलेच्या भूमिकेत दिसत असून ती आरशासमोर तयार होत असते. टिकली लावून, कानाला मफलर बांधून तयार झाल्यावर ती आरशात बघून स्वतःकडेच कौतुकाने बघते. त्यानंतर नवऱ्याला हाक मारते आणि त्याच्यामुळे कसा सगळीकडे जायला उशीर होतो यावरून टोमणाही मारते. या ब्लॅक ऍण्ड व्हाइट प्रोमोमध्ये एकटी अक्षयाच दिसते आहे.

 लवकरच रंगभूमीवर येत असलेल्या या नाटकाची निर्मिती भूमिका थिएटर्स आणि वाइड अँगल एंटरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर  लिखित आणि अशोक पत्की यांचे संगीत असणारे दोन अंकी नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे.