ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचे निधन,मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती कोरोनाची लागण

सोनी मराठी वाहिनीवरील नुकत्याच सुरू झालेल्या ‘आई माझी काळूबाई’  या मालिकेत काम करणाऱ्य़ा ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्या 79 वर्षांच्या होत्या. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती, ज्यामुळे त्यांना साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील 27 कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी सोमवारी समोर आली होती, ज्यात आशालता यांचेही नाव होते. साताऱ्य़ात या मालिकेचे शूटिंग सुरू होते.

‘आई माझी काळूबाई’ ही मालिका नुकतीच सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आशालता आणि अलका कुबल यांची प्रमुख भूमिका असलेला माहेरची साडी हा चित्रपट खूप गाजला होता. माझी आई काळूबाई या मालिकेच्या निमित्ताने या दोघी पुन्हा एकत्र आल्या होत्या. गेल्याच आठवड्यात मालिकेतील एका गाण्याच्या शुटींगसाठी मुंबईवरून साताऱ्य़ात डान्स ग्रुप बोलावण्यात आला होता. त्यांच्यामार्फत सेटवर कोरोनाने शिरकाव केल्याचे म्हटले जात आहे.

आशालता या मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकासृष्टीतील अत्यंत गुणी अभिनेत्री होत्या. अभिनेत्री अलका कुबल यांच्यासोबत त्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेमध्ये काम करत होत्या आणि या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या सातारा इथे आल्या होत्या. या मालिकेचे चित्रीकरण जिल्ह्यातील फलटण, लोणंद, वाई या परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. एका गाण्यासाठी मुंबईहून एक डान्स ग्रुप आला होता, ज्यातील काहीजण कोरोनाबाधित असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आशालता यांना अचानक अस्वस्थ वाटायला लागले होते, ज्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आशालता यांनी मराठीव्यतिरिक्त कोकणी, हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. मूळच्या गोव्याच्या असल्याने त्यांनी कोकणी आणि नंतर मराठीतून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केली असून रुपेरी पडद्याप्रमाणेच त्यांनी नाट्यभूमीही गाजवली होती. संगीत नाटक मत्स्यगंधाद्वारे त्यांनी नाट्यभूमीवर पाय ठेवले होते. उत्तम गायिका असलेल्या आशालता यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले होते. मराठी चित्रपटांप्रमाणेच आशालता यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. बासू चॅटर्जी यांच्या ‘अपने पराये’ हा चित्रपट त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. याच चित्रपटासाठी त्यांना फिल्म फेअरचे उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.

रायगडाला जेव्हा जाग येते (1962),मत्स्यगंधा (1964) ,आश्चर्य नंबर 10 (1971), गरुड झेप (1972), विदूषक (1972) , गुंतता हृदय हे (1974), गुड बाय डॉक्टर (1976), गोष्ट जन्मांतरीची (1978), छिन्न (1979), देखणी बायको दुसऱ्याची (1992) या नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.

आपली प्रतिक्रिया द्या