येसूबाई जगताना….

>> शब्दांकनः राज चिंचणकर

आयुष्यात खूप काही देऊन गेलेल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेच्या निमित्ताने संवाद साधतेय, अभिनेत्री दीप्ती भागवत…

माझ्या आयुष्यात मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना एकदा तरी भेटायचे होते आणि ती संधी मला ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेमुळे मिळाली. अर्थात ही इच्छा माझ्या मनात 2010 पासून म्हणजे जेव्हा मी ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका केली तेव्हापासूनच होती, पण माझी ही इच्छा ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेमुळे पूर्ण झाली. या मालिकेच्या दरम्यान, मला आदरणीय वृषाली राजे भोसले यांना भेटता आले. या भेटीचे कारणही अत्यंत हृद्य होते. त्या वर्षापासून महाराणी येसूबाई यांच्या नावाने पुरस्कार देण्यास आरंभ झाला आणि मालिकेत मी येसूबाईंची भूमिका साकारत असल्याने माझ्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माझ्या भूमिकेला मिळालेली ही मोठी दाद आहे, असे मी मानते. या मालिकेत औरंगजेबाच्या सोबतचे माझे धारदार संवादही गाजले. ‘तलवारीच्या मुठीला हिरवा चांदतारा बांधून आमच्या पोटात जरी खुपसलात, तरी रक्तातून ओघळणाऱया प्रत्येक थेंबाचा रंग हा भगवाच असेल,’ आदी संवाद तर अनेकांच्या स्मरणात आजही असतील.

‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेच्या पहिल्या भागातच दाखवले गेले होते की, छत्रपती संभाजी महाराज यांचे निधन झाले आहे. या प्रसंगाच्या दरम्यान, देवीआईचा गोंधळ सुरू असतो आणि शंभूपत्नी महाराणी येसूबाई कपाळी मळवट भरण्यासाठी सरसावत असतानाच ती कटू वार्ता त्यांच्या कानांवर येते. अशा अवघड प्रसंगापासून सुरू झालेला ‘येसूबाई’ या भूमिकेचा माझा मालिकेतला प्रवास पुढे सुरू राहिला. येसूबाईंनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय, त्यांचा त्याग, पुढे औरंगजेबाच्या नजरकैदेत काढलेली तब्बल 30 वर्षे. या वास्तव्यात आपला पुत्र शाहू महाराजांचा केलेला सांभाळ, त्यांच्यावर केलेले संस्कार, धर्मांतरासारख्या अनेक संकटांवर केलेली मात, संघर्ष हे सर्वकाही पडद्यावर साकारण्याची संधी मला या मालिकेच्या निमित्ताने मिळाली हे माझे भाग्यच आहे.

या मालिकेत महाराणी येसूबाई ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा मी साकारली आणि जेव्हा या मालिकेचे 100 भाग पूर्ण  झाले, तेव्हा कृतज्ञता म्हणून या मालिकेचे पडद्यामागचे सर्व कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक यांना आपल्याकडून काहीतरी द्यावे असे मला वाटले, पण हे सर्व कल्पनेतच राहिले. प्रत्यक्षात माझ्याकडून काही वस्तू वगैरे आणली गेली नाही. तोपर्यंत 100 व्या भागाचा दिवसही उजाडला. सेटवर संध्याकाळी एक समारंभ होता आणि तिथे जाण्यासाठी मी निघाले होते. माटुंगा ते गोरेगाव या रेल्वे प्रवासात मला अचानक एक काव्य स्फुरले आणि मी एकटाकी ते लिहून काढले. हे काव्य म्हणजे एक पोवाडा होता. जो माझ्याकडून आमच्या सर्व पडद्यामागच्या कलाकारांसाठी लिहिला गेला होता. सेटवर मी हा पोवाडा सादरही केला. मी पोवाडा गात असताना त्या सर्व मंडळींच्या चेहऱयांवर जो आनंद पसरला होता, तो मी कधीही विसरू शकत नाही. जवळपास दहा कडव्यांचा पोवाडा आपण कसा काय लिहिला, हे आजही मला उलगडत नाही. अशा प्रकारचे कितीतरी प्रसंग आयुष्यात घडतात, पण आपण कुणाला काही देणे, याहून अधिक सुंदर असे दुसरे काहीच नाही. मग ते भक्ती, प्रेम, कृतज्ञता अशा कोणत्याही स्वरूपात किंवा शाश्वत भौतिक गोष्टींच्या पलीकडलेही असू शकते.