डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला तर त्यांच्या घराबाहेर मोर्चा काढाल का? घराणेशाहीवर जान्हवी कपूरचा सवाल

2212

नेपोटिझमवरून बॉलिवूडमध्ये सुरू झालेला वाद क्षमण्याचे नाव घेत नाहीये. करण जोहर व कंगना रनौतमध्ये वाद झाल्यानंतर गली बॉय फेम अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदीने देखील अनन्या पांडेला नेपोटीझमवरून चांगलाच टोला लगावला होता. आता या वादात श्रीदेवीची मुलगी व अभिनेत्री जान्हवी कपूर देखील पडली आहे. ‘मी ज्या डॉक्टरांकडे जाते त्यांचा मुलगा देखील डॉक्टर आहे. त्यामुळे आम्ही या डॉक्टरकडून तपासणी करून घेणार नाही, असे सांगत कुणी मोर्चा नाही काढत’, असे वक्तव्य जान्हवीने केले आहे.

जान्हवी कपूरने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हे वक्तव्य केलं आहे. ‘इंडस्ट्रीमध्ये नेपोटीझम आहे हे मी नाकारत नाही. घराणेशाही ही या इंडस्ट्रीतील तसेच इतरही बऱ्याच प्रोफेशनमधील एक सत्य आहे. इंडस्ट्रीचा बॅकग्राऊंड नसलेल्या कलाकारांना काम मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जी मला करावी लागली नाही. त्यांची मेहनत ही एका सामान्य व्यक्तीच्या मेहनतीशी मिळतीजुळती असते. मला त्यांच्या तुलनेत फार कमी मेहनत घ्यावी लागली. पण आता मला जी संधी मिळाली आहे तिचं सोन करण्यासाठी मला देखील त्यांच्याइतकीच मेहनत करावी लागतेय’, असे जान्हवीने सांगितले.

आजही लोकं श्रीदेवीला माझ्यात शोधतात
‘लोकांना समजलं पाहिजे की मी व माझी आई या दोन भिन्न व्यक्त आहोत. आमची आवड निवड वेगळी आहे. आजही अनेक लोक माझ्यात श्रीदेवीला शोधतात. श्रीदेवी यांचा जलवा कुणीच पुन्हा स्क्रिनवर दाखवू शकत नाही. कदाचित जसजसं मी काम करत जाईन तस तसा लोकांना मी वेगळी व्यक्ती आहे याची जाणीव होईल’, असेही श्रीदेवीने सांगितले.

जान्हवी कपूर ही लवकरच करण जोहरच्या आगामी गुंजन सक्सेना – कारगिल गर्ल या चित्रपटात दिसणार आहे. हा तिचा दुसरा चित्रपट असणार आहे. गुंजन सक्सेना या हिंदुस्थानच्या वायुदलात फ्लाईट लेफ्टनंट पदावर कार्यरत होत्या. कारगिल गर्ल अशी ओळख असणाऱ्या गुंजन 1996च्या कारगिल युद्धादरम्यान चीता हेलिकॉप्टरच्या साहाय्याने युद्धातील जखमी जवानांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं कार्य करत होत्या. पाकिस्तानी सैन्याकडून डागलेल्या मिसाईलच्या कचाट्यात त्यांचं हेलिकॉप्टरही सापडलं. पण त्या थोडक्यात बचावल्या. या हल्ल्यानेही न डगमगता त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. त्यांच्या या अतुलनीय साहसासाठी त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. शरण शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 24 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या