
अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक वर्ष आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या विक्रम गोखले यांच्या निधनाने अनेक कलाकार मंडळी भावूक झाली आहेत. नुकतीच अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी देखील त्यांच्यासाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
नीना कुलकर्णी आणि विक्रम गोखले यांचा एकत्र काम केलेला चित्रपट गोदावरी याच महिन्यात रिलीज झाला आहे. नीना कुलकर्णी म्हणतात ”विक्रम गोखले माझा गुरु बंधू. तुझ्याबरोबर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांतून काम केलं. तुझी बहीण म्हणून तर कधी बायको म्हणून ते अगदी आता आता तुझी सून म्हणून देखील काम केलं. दरवेळी मला अभिनयातला एखादा नविन पैलू तू दाखवून दिलास. तुझ्याकरता मी तुझी गुरु भगिनी आणि मैत्रिण होते. तुझ्याबरोबर काम करताना अनुभवणारी सहजता, काहीतरी मोलाचं गवसल्याचं कलात्मक समाधान. या संचिता करता मी तुझी ऋणी आहे. हा अनुभव पुन्हा पुन्हा मिळणे नाही. तुझं थोरपण तुझ्या अभिनयातल्या सहजतेमध्ये, व्यक्तिरेखा जाणून घेण्याच्या ताकदीमध्ये, तुझ्यातल्या अभ्यासाच्या कुतुहलामध्ये होतं. असतील बहु, होतील बहु, परंतु या सम हा”, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. सोबतच गोदावरी या चित्रपटात विक्रम गोखले मारुतीच्या पायाला पाणी लागण्याची वाट पाहत असतात. त्याचा संदर्भ देत ”“मारूतीच्या पायाला आज पाणी लागलं” अशी भावूक प्रतिक्रीया दिली.