बॉलीवूडची ‘आई’ हरपली, रीमा लागू यांचं निधन

रिमा लागू

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदी आणि मराठी सिने सृष्टीमध्ये ‘आई’च्या भूमिकेतून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं आज मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णायत निधन झालं. त्या ६० वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून बॉलीवूडची ‘आई’च हरपल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

बुधवारी रात्री रीमा लागू यांच्या छातीत दुखत असल्यानं त्यांना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी दोन वाजता ओशीवारा स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती निकटवर्तीयांकडून देण्यात आली.

मराठी रंगभूमी, हिंदी आणि मराठी सिनेमा, टीव्ही अशा तीनही ठिकाणी त्यांनी आपलं कायम वर्चस्व ठेवलं. हिंदुस्थानी आईची भूमिका साकारताना तिच्या हळवेपणा, मुलांसाठी धडपडणारी- खस्ता खाणारी, प्रेमळ स्वभाव याचं हुबेहूब चित्रण उभं करण्याचं सामर्थ्य रीमा लागू यांच्याकडे होतं. मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है मधून हळवी आई, तर वास्तव सारख्या सिनेमातून काळजावर दगड ठेवून मुलाला गोळी घालणारी आई त्यांनी अशी रेखाटली की त्याची छाप प्रेक्षकांवर कायम राहिली.

१९८० मध्ये ‘कलयुग’ सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं आणि आपल्या दमदार अभिनयानं कायमचं स्थान निर्माण केलं. ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमात अभिनेत्री जुही चावला यांच्या आईची भूमिका साकारली आणि मग मैने प्यार किया, साजन, आशिकी अशा एका पाठोपाठ एक सिनेमातून त्यांची कारकीर्द बहरत गेली. ‘आई’ म्हटलं की रीमा लागू हे जणू समीकरणच बनलं.

टीव्हीवर मालिकांमध्ये देखील त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. सुप्रीया पिळगावकर यांच्या सोबत त्यांनी केलेली ‘तू तू मै मै’ ही त्यांची मालिका चांगलीच गाजली. यामध्ये त्यांनी सासूची भूमिका एकदम ठासून वठवली होती. ‘श्रीमान- श्रीमती’मधील त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या