खंडणी प्रकरणी प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला पुणे पोलिसांकडून अटक

7652

विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एका नवोदीत कलाकाराकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी मराठी अभिनेत्री सारा श्रवण हिला अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री मुंबईमधून साराला अटक केली. हा गुन्हा गंभीर स्वरुपात मोडत असल्याने न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रोल नंबर 18’ या चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध कटकारस्थान करून विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्या प्रकरणी अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अभिनेते सुभाष दत्तात्रय यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहकारनगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याप्रकरणी ‘रोल नंबर 18’ या चित्रपटातील अभिनेत्री रोहिणी माने, दहशतवादविरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल टेकाळे आणि सराईत गुन्हेगार राम जगदाळे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तेव्हापासून सारा श्रवण ही दुबईला पळून गेली होती.

काय आहे प्रकरण?
तक्रारदार अभिनेत्याला बांधकाम व्यावसायिकाने त्याच्याविरोधातील गुन्ह्याप्रकरणी तडजोडीसाठी त्याच्या कार्यालयात बोलावलं होतं. हा अभिनेता जेव्हा कार्यालयात पोहोचला तेव्हा ATS चा पोलीस अधिकारी आणि त्याच्याविरोधात तक्रार करणारी अभिनेत्रीदेखील तिथे हजर होती. या तिघांनी अभिनेत्याला जबरदस्तीने माफी मागायला लावली आणि त्याचा व्हिडीओ चित्रीत केला. बांधकाम व्यावसायिक, अभिनेत्री आणि पोलीस अधिकाऱ्याने आपल्याकडून व्हिडीओ व्हायरल न करण्यासाठी 15 लाख रूपये खंडणी मागितल्याचा आरोप अभिनेत्याने केला.

आपली प्रतिक्रिया द्या