आपल्या भारतीय समाजमनात पुरुषप्रधान मानसिकता असून, स्त्रियांच्या संदर्भातील असमानता आजही टिकून आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यातील पिढीचे प्रतिनिधी असणारी बालकांची पिढी घडवायची असेल, तर समाजमनातील पुरुषप्रधान मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांनी केले.
ग्रॅव्हिट्स फाउंडेशन आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल्यावस्थापूर्व संगोपन’ (अर्ली चाईल्डहूड डेव्हलपमेंट) या विषयावरील गोलमेज परिषदेत आझमी बोलत होत्या. यावेळी राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे, युनिसेफ महाराष्ट्रचे प्रमुख संजय सिंग, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग, डॉ. अमिता फडणीस, बाल्यावस्थेतील संगोपन अभ्यासक डॉ. सिमीन इराणी, अभिनेत्री तनिषा मुखर्जी, लाईफ कोच प्रीती बानी, युनिसेफ महाराष्ट्रच्या संवादक स्वाती महापात्रा, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आदींनी आपले विचार मांडले.
शबाना आझमी म्हणाल्या, आपल्या समाजातील पारंपरिक समज, गैरसमज, स्त्री-पुरुषांमधील कमालीची असमानता, स्वातंत्र्याचा अभाव, मोकळेपणा नसणे आणि सतत लादले जाणारे मातृत्व यामुळे पुरुषसत्ताक मानसिकतेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसतो. आपले चित्रपट, मालिकाही या पुरुषप्रधान मानसिकतेला खतपाणी घालणारे असतात. प्रास्ताविक करताना उषा काकडे यांनी गोलमेज परिषदेच्या आयोजनामागील संकल्पना स्पष्ट केली. लीना सलढाणा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.