‘सो कुल’ने वातावरण तापवले, सोशल मीडियावर होतेय स्त्रीवादावर चर्चा

मुलींना ‘आळशी’ म्हटल्याने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वादात सापडली आहे. नेहमी सडेतोड आणि स्त्रीवादी विचार मांडणाऱया सोनालीच्या वक्तव्याने एकच गदारोळ होतोय. सोनालीला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत असताना, तिच्या समर्थनार्थही नेटीजन्स उतरल्याचे दिसत आहेत. यानिमित्ताने स्त्रीवाद हा मुद्दा चर्चेत आला आहे. एकूण काय तर ‘सो कुल’ने वातावरण तापवले.

एका मुलाखतीत सोनाली म्हणाली, ‘‘देशातील बऱ्याच मुली आळशी आहेत. त्यांना असा बॉयफ्रेंड किंवा पती हवा आहे, ज्याच्याकडे चांगली नोकरी असेल. ज्याच्याकडे घर हवे, पण त्या मुलीमध्ये एवढी हिंमत नाही की, ती म्हणेल जेव्हा तू माझ्यासोबत लग्न करशील, तेव्हा मी आपल्या दोघांसाठी काय करू शकते.’’

मुलींना ऐशोआराम हवा असेल तर त्यांनीही पैसे कमवावेत असा मुद्दा तिने मांडला. सोनालीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून ती सतत ट्रोल होत आहे. सोनालीने आता माफी मागितली आहे. सोनाली म्हणाली, ‘‘मी स्वतः एक स्त्री असल्यामुळे इतर महिलांना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. उलट स्त्री असणे म्हणजे काय, याबाबत मी नेहमीच व्यक्त झाले आहे.

– सोशल मीडियावर दोन्ही बाजूंच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आळस सोडा, गृहिणींना स्वतःच्या दुखण्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. घर सांभाळण्यापेक्षा जॉब बरा, अशी म्हणण्याची वेळ आली आहे, अशाही प्रतिक्रिया उमटत आहेत.
– काही पुरुष अनुभव शेअर करताना दिसत आहेत. जेव्हा समान वय, समान शिक्षण असणाऱया मुली लग्नासाठी सांगून येतात, तेव्हा मुलीच्या वडिलांची अपेक्षा असते की, मुलाचे उत्पन्न मुलीपेक्षा जास्त असावे, हे कसे शक्य आहे. असा सवाल काही मुलांनी विचारला आहे.
– स्त्रीवादी असण्याचे फायदे हवे आहेत, पण स्वावलंबी बनत सांसारिक जबाबदाऱया नको… असाही टीकेचा एक सूर राहिला.
– स्त्रीयांनी आर्थिकदृष्टीने स्वावलंबी व्हावे हा आग्रह बरोबर आहे, पण पुरुषप्रधान व्यवस्थेत किती स्त्रीयांना ही संधी मिळते? ग्रामीण भागांतील स्त्रीया घरातील सर्व कामे करून शेतात राबतात, पण त्या स्त्रीयांच्या हातात चार पैसे येतात का? किती जणींच्या नावावर घर आहे? किती जणींचे बँकेत स्वतंत्र खाते आहे? असे ग्रामीण भागांतील वास्तव यानिमित्ताने काहींनी मांडले आहे.