अदानी समूहात आर्थिक गडबड – हिंडनबर्ग अहवालाची सेबी आणि आरबीआयमार्फत चौकशी करा! कॉँग्रेस नेते जयराम रमेश यांची मागणी

अदानी उद्योग समूहाने मोठय़ा प्रमाणात करचुकवेगिरी आणि आर्थिक गडबड केल्याचा ठपका हिंडेनबर्ग शोध अहवालात ठेवण्यात आला आहे. अदानी समूहातील कंपन्यांचे समभागाच्या किमती आणि कर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे हिंडेनबर्ग अहवालाची सेबी आणि आरबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कॉँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, एखाद्या राजकीय पक्षाने हेज फंडाद्वारे उभारण्यात आलेल्या पंपन्या किंवा उद्योग समूहाच्या संदर्भातील अहवालावर प्रतिक्रिया देणे अपेक्षित नाही. पण हिंडेनबर्ग अहवाल प्रकरण हे देशाच्या आर्थिक स्थिरतेशी निगडित आहे. तसेच अदानी हा एखादा किरकोळ उद्योग समूह नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून हा समूह प्रकाशझोतात आला आहे. या समूहाचे प्रमुख गौतम अदानी आणि मोदींचे जवळचे संबंध असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अदानींशी संबंधित शेअर्सही कोसळले

शेअर्समध्ये फेरफार केल्याच्या अमेरिकेच्या हिंडनबर्ग शॉर्ट सेल रिसर्चच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या 9 पंपन्यांचे शेअर्स आज जोरदार कोसळले. त्यामुळे बुधवारपासून अदानी समूहाचे एकूण 4.2 लाख कोटींचे नुकसान झाले. मोठय़ा अपेक्षेने काढलेल्या अदानी समूहाच्या ‘एफपीओ’कडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली. अदानींच्या ‘एफपीओ’ला पहिल्या दिवशी केवळ एक टक्के प्रतिसाद मिळाला.