अदानी समूहातील २ कंपन्यांच्या समभागांना अपर सर्कीट, इतर समभागही तेजीत

हिंडेनबर्ग रिसर्चने अहवाल सादर केल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांना ग्रहण लागलं होतं. या अहवालामुळे गौतम अदानी आणि त्यांनी निर्माण केलेल्या उद्योग विश्वातील कंपन्यांची पत आणि मालमत्ता या दोन्हीत लक्षणीय घसरण व्हायला लागली होती. सोबतच या कंपन्यांचे समभागही वेगाने घसरायला लागले होते. समभागांची किंमत जवळपास 66 टक्क्यांनी घसरल्याने अदानी समूहाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. 24 जानेवारी 2023 नंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांची किंमत रोज घसरत होती. समभागांच्या घसरत्या किंमतीमुळे अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये 10 लाख कोटींची घसरण झाली आहे. आणि हे नुकसान फक्त 10 दिवसांत झाले आहे. या 10 दिवसांत अदानी समूहाने जेवढी रक्कम गमावली त्या रकमेतून 80 कोटी लोकांना पुढील 5 वर्ष मोफत रेशनचे धान्य मिळू शकले असते. मात्र ही परिस्थिती मंगळवारी बदलताना पाहायला मिळाली. अदानी समूहाच्या कंपन्यांचे बहुतांश समभाग हे तेजीत असल्याचे दिसून आले.

अदानी समूहातील दोन कंपन्यांच्या समभागांना अपर सर्कीट लागलेले पाहायला मिळालं. यामुळे या समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. अदानी ग्रीन आणि अदानी ट्रान्समिशन या कंपन्यांचे समभाग आज तेजीने वाढताना दिसले. हा फरक अदानी समूहाने घेतलेल्या एका निर्णयामुळे पडला आहे. अदानी समूहाने तारण म्हणून ठेवलेले स्वत:चे समभाग वेळेच्या आधी पूर्ण रक्कम भरून सोडवून घेतले आहे. यासाठी अदानी समूहाने 9185 कोटी रुपये रक्क मोजली आहे. एकीकडे हे सुरू असताना अदानी ट्रान्समिशन कंपनीचे तिमाही आकडे प्रसिद्ध करण्यात आले. कंपनीच्या नफ्यात 73 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले असल्याने मंगळवारी या कंपनीच्या समभागांना अपर सर्किट लागलेले पाहायला मिळाले. अदानी पॉवर या एकाच समभागाला लोअर सर्कीट लागले होते, म्हणजे त्याची किंमत वेगाने कोसळली होती.