प्रत्येकाला कोरोना लस टोचण्यासाठी हवेत 80 हजार कोटी,सरकारकडे एवढे पैसे आहेत का? अदर पुनावाला यांचा सवाल

देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत कोरोना लस पोहचविण्यासाठीचा खर्च 80 हजार कोटींपर्यंत येणार आहे. पुढील वर्षापर्यंत केंद्र सरकारकडे एवढे पैसे आहेत का, असा सवाल सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विटद्वारे आरोग्य मंत्रालयाला केला आहे. या ट्विमध्ये पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) टॅग करण्यात आले आहे.


पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादन कंपनी आहे. सिरम इन्स्टिटय़ूटने कोरोना लसीचे उत्पादन आणि वितरणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. अदर पुनावाला यांनी दोन ट्विट केले आहेत. पुढच्या वर्षभरासाठी केंद्र सरकारकडे 80 हजार कोटी रुपये आहेत का? कारण ती लस विकत घेवून प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकांसाठी पोहचविण्यासाठी इतका खर्च येणार आहे. या आव्हानाचा सामना आता करायचा आहे असे त्यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


मी हा प्रश्न यासाठी विचारला, कारण आपल्याला योजना आखावी लागणार आहे. आपल्या देशात लागणारी लसची गरज लक्षात घ्यावी लागेल. लसीची खरेदी आणि वितरण यासाठी लस उत्पादकांना मार्गदर्शन करावे लागेल. त्याकडेही अदर पुनावाला यांनी दुसऱया टिविटमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे.

ऑक्सफर्डसह इतर लस संशोधन संस्थांबरोबर करार
सिरम इन्स्टिटय़ूटने कोरोना लसीचे उत्पादन आणि वितरणासाठी ब्रिटनचे ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकासह कोव्हीशिल्ड, अमेरिकेच्या कोडेजेनिक्स लसीचे उत्पादन करण्याचा करार केला आहे. कोव्हीशिल्ड लसीची मानवी चाचणी पुण्यात आहे. ऑक्सफर्डच्या लसीच्याही चाचण्या सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या