भाजपच्या कृषी मंत्र्यांविरोधात अटक वॉरंट जारी

सामना ऑनलाीन । देवरिया

उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधील कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील देवरिया येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चंद्र मोहन चतुर्वेदी यांनी कृषी मंत्र्यांविरोधात अटक वॉरंट जारी केली आहे. एका २४ वर्षापूर्वीच्या खटल्यामध्ये मागील ११ वर्षामध्ये एकदाही उपस्थित न राहिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही यांच्यावर १९९४मध्ये सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सन २०४मध्ये सुरू झाली होती. तेव्हा कृषी मंत्री शाही यांना जामिन देण्यात आला होता. यानंतर सन २००७मध्ये शाही याना न्यायालयामध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत ते न्यायालयात हजर न झाल्याने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. शाही याच्यावर कलम ३५३ आणि ५०६ अन्वये कसया पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल आहे. चंद्रिका सिंह यांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळ निर्माण केल्याचा आरोप केला होता.