अधिक मासारंभ, महिनाभर आता विवाह सोहळे बंद, शुभ कार्यांनाही फाटा

144

विजय जोशी, नांदेड

उद्यापासून अधिक मास अर्थात धोंड्याच्या महिन्याला प्रारंभ होणार असून, आजपासूनच कुठलेही शुभकार्य, विवाह सोहळे, मंगलकार्य, नव्या कामांचा शुभारंभ करता येणार नाही. जावई बापूंच्या आगमनाच्या तारखा आता ठरु लागल्या असून, ३३ प्रकारची व्यंजने आणि अन्य मानपान यासाठी मुलीकडील मंडळी, सासरची मंडळी सज्ज झाली आहे.

अधिकमास नेमका काय आहे, हे सांगताना वेदशास्त्र संपन्न खंडूगुरु जोशी आसोलेकर यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते. परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात. आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षाने (अर्थात ३२ महिने १६ दिवसानी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले. दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो परंतु या अधिक तेराव्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते म्हणून याला अधिकमासासह मलमास देखील म्हटले आहे. याच महिन्यात स्वामी मुरलीधर, श्रीकृष्ण, भगवान विष्णू यांची भक्ती,पूजा, अर्चा करावी असे संकेत आहेत.

१६ मे अर्थात ज्येष्ठ शुध्द एक ते ज्येष्ठ अमावस्या अर्थात १६ मे ते १३ जूनपर्यंत अधिकमास पाळला जाणार आहे. या काळात कुठलेही शुभकार्य, देवप्रतिष्ठापणा, ग्रहारंभ, वास्तूशांत, विवाह, उपनयन, तिर्थयात्रा किंवा विशेष मंगलकार्य करु नये, असे संकेत आहेत. हिंदू धर्मात मुलगी-जावयाला लक्ष्मीनारायणाची जोडी असे संबोधले जाते. म्हणूनच या महिन्यात जावई बापूला ३३ च्या पटीत वेगवेगळी मिष्ठान्ने देण्याची प्रथा आहे. ज्यात बत्तासे, अनारसे, मैसूर पाक, नारळ, सुपारी, फळे आणि धोंडे अर्थात पुरणाची दिंड करुन ते जावयासह इष्टमित्रांना भोजन म्हणून देण्याची प्रथा आहे. यामुळे सगळ्याच घरी आता अधिकमासाची लगबग सुरु आहे. प्रत्येक घरात कोणी ना कोणी जावई किंवा सासरा असतोच, त्यामुळे हिंदु कुटुंबियांत या महिन्याची लगबग वेगाने सुरु झाली आहे. जावई बापूच्या आगमनाची सर्वत्र ओढ लागली असतानाच घरोघरी ३३ पदार्थ व मिष्ठान्ने देण्यासाठी नियोजन सुरु झाले आहे. अधिकमासात उपोषणाला देखील महत्व असून, महिनाभर अखंड दिप लावल्यास लक्ष्मी प्राप्त होते, असाही संकेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या