लहानग्यांना अंगणवाडीतच मिळणार आधार

प्रातिनिधीक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । पुणे

लहान तसेच नुकत्याच जन्मलेल्या मुलांना आता अंगणवाडीमध्येच आधार कार्ड मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागातर्फे यासाठी अंगणवाडी सेविका तसेच पर्यवेक्षिकांना टॅबवर आधार कार्ड काढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सेविका नवजात बालकांच्या घरी जाऊन, तर पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना अंगणवाडीत टॅबवर आधार कार्ड काढून मिळणार आहे.

शासनातर्फे आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. शालेय मुलांनाही आधार कार्ड आवश्यक असल्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना घेऊन आधार कार्ड केंद्रावर जावे लागते. मात्र, जिल्ह्यातील अनेक आधार केंदे बंद असल्यामुळे आधार कार्ड काढताना विविध अडचणी येत होत्या. जिल्ह्यातील लहान मुलांना लहानपणीच आधार कार्ड मिळावे यासाठी महिला-बालकल्याण केंद्रातर्फे अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यातील १६२ पर्यवेक्षिका, तर शहरी भागातील ५४ अशा २१६ अंगणवाडी पर्यवेक्षिकांना हे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात देण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, महिला बालविकास मंत्रालयाचे सहसचिव लाससिंग गुजर, सहसचिव रमेश सरफरे, मोतिराम रॉड्रिक्स, महिला-बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे उपस्थित होते. या प्रशिक्षणांतर्गत टॅब कसा वापरावा, त्याद्वारे आधार नोंदणी कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील तसेच शहरातील शून्य ते ५ वयोगटातील बालकांची नोंदणी अंगणवाडीतच करण्यात येणार आहे. यामुळे रांग लावून आधार कार्ड काढण्याचा पालकांचा मनस्ताप कमी होणार आहे.

दरम्यान, शासनातर्फे आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे. लहान मुलांपासून शालेय विद्यार्थ्यांनाही आधार कार्ड काढणे गरजेचे असते. मात्र, जिल्ह्यातील अनेक केंद्रे बंद आहेत. त्यामुळे असलेल्या केंद्रावर कार्ड काढण्यासाठी आपल्या मुलांसह पालकांना थांबावे लागत होते. त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी आधार देण्याचा उपक्रम राबविण्यात आला असून, अंगणवाडीतच ‘आधार’ मिळणार असल्याने पालकांचा त्रास कमी होणार आहे, असे महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या