पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अदिती घवाळी मुंबईतून पहिली

38

सामना प्रतिनिधी । मुंबई

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. पाचवीच्या परीक्षेत विलेपार्लेच्या श्री माधवराव भागवत शाळेची विद्यार्थिनी अदिती संदीप घवाळी हिने 93.05 टक्के गुण मिळवत मुंबईतून प्रथम तर राज्यातून 17वा क्रमांक पटकावला. तर आठवीच्या परीक्षेत ठाणे येथील आयईएस चंद्रकांत पाटकर शाळेचा विद्यार्थी श्रेयस दुर्वेने 94.40 टक्के गुण मिळवत राज्यात चौथा येण्याचा मान मिळवला आहे.

राज्यातील एकूण 4 लाख 95 हजार 546 विद्यार्थ्यांनी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली. यांपैकी 1 लाख 9 हजार 230 विद्यार्थी पात्र ठरले असून 16 हजार 579 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. 17 हजार 217 विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर होते. एकूण निकालाची टक्केवारी 22.04 टक्के आहे. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या एकूण 3 लाख 41 हजार 991 विद्यार्थ्यांपैकी 63 हजार 236 विद्यार्थी पात्र ठरले असून 14 हजार 815 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. या परीक्षेला 11 हजार 377 विद्यार्थी गैरहजर होते. निकालाची एकूण टक्केवारी 18.49 इतकी आहे. विद्यार्थ्यांना छापील गुणपत्रिका शाळांमार्फत 1 ऑगस्टपर्यंत मिळतील, असे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले.

मुंबईतून प्रथम आलेले विद्यार्थी  

पाचवी

पश्चिम मुंबई अदिती घवाळी 93.05 टक्के

दक्षिण मुंबई श्लोक भावे 88.19 टक्के

उत्तर मुंबई साची गोगरी 88.19 टक्के

आठवी

दक्षिण मुंबईविराज साळुंखे 93.70 टक्के

उत्तर मुंबईआर्या भोसले 90.90 टक्के

पश्चिम मुंबईसिद्धांत शेणॉय 89.51 टक्के

आपली प्रतिक्रिया द्या